उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वणव्याचा धोकाप्रतिबंधासाठी डहाणू वन विभागाचे जनतेला आवाहन

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वणव्याचा धोकाप्रतिबंधासाठी डहाणू वन विभागाचे जनतेला आवाहन
पालघर, (प्रतिनिधी)दि. ११ मार्च : उन्हाळ्यात वाढत चाललेल्या तापमानामुळे जंगलातील वणव्याच्या घटनांचा धोका वाढला असून मौल्यवान वनसंपदा, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन डहाणू वन विभागाने केले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या डहाणू वनविभागाचे एकूण वनक्षेत्र तब्बल ९१८.६६ चौ. कि.मी. इतके आहे. पश्चिमेस अरबी समुद्र तर इतर तीनही बाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या विभागाला उत्तरेस गुजरात राज्य व दादरा-नगर हवेली-दमन-दीव केंद्रशासित प्रदेश, पूर्वेस जव्हार वनविभाग आणि दक्षिणेस ठाणे वनविभागाची सीमा आहे. या विभागात १२ वनक्षेत्रे, ५८ परिमंडळे आणि १६५ नियतक्षेत्रे कार्यरत आहेत.
सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे आणि कोरड्या हवामानामुळे जंगलात नैसर्गिक कारणांमुळे किंवा मानवी दुर्लक्षामुळे वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. डहाणू वनविभागात २५,५८२ वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर असून सुमारे १५,७४० हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाते. शेतीच्या कामासाठी पाला-पाचोळा जाळण्याच्या प्रक्रियेमुळे जंगलाला आग लागण्याची शक्यता अधिक असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
वणवा रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना
वाढत्या वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी वन विभागाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत.
जनजागृती मोहीम : वनक्षेत्रालगत राहणारे नागरिक, ग्रामस्थ व पर्यटक यांच्यात वणव्याचे दुष्परिणाम आणि प्रतिबंधक उपाय याबाबत संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विशेष जनजागृती केली जात आहे. स्थानिक बैठका घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
फायर लाईन नियोजन : वणवा पसरू नये यासाठी दरवर्षी १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जंगलाच्या सीमा, रोपवन, राज्य सीमा तसेच महामार्गालगत ‘फायर लाईन’ तयार केल्या जातात.
फायर वॉचर्स तैनात : आगीची माहिती मिळताच तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी १३५ फायर वॉचर्स नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे फायर ब्लोअर (५७), फायर बिटर्स (३३), फायर रॅक्स (४) तसेच फायरप्रूफ गणवेश अशी आधुनिक साधने उपलब्ध आहेत.
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (FSI) कडून मिळणाऱ्या अलर्टनुसार आगीची माहिती मिळताच वनवणवा नियंत्रण कक्षातून संबंधित वनक्षेत्रपालांना तत्काळ सूचना देऊन आग विझविण्याची कार्यवाही केली जाते.
वन विभागाच्या आकडेवारीनुसार २०२४-२५ मध्ये १८० वणव्यांच्या घटनांमुळे ३८६.५६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर २०२५-२६ मध्ये (फेब्रुवारी अखेरपर्यंत) ४२ घटना नोंदवून ७०.७७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे विभागाने सांगितले.
रात्रगस्त : दिवसासोबतच रात्रीच्या वेळीही वन कर्मचारी नियमित गस्त घालून वणव्याच्या घटनांवर लक्ष ठेवत आहेत.
वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई
वनक्षेत्रात जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ व ३३ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
नागरिकांना आवाहन
जंगल परिसरात पेटती काडी, सिगारेट किंवा अन्य ज्वलनशील वस्तू टाकू नयेत. वनक्षेत्रात कुठेही आग लागल्याचे आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे.
यासाठी महाराष्ट्र वन विभागाचा टोल-फ्री क्रमांक १९२६ तसेच डहाणू वनविभागाच्या वनवणवा नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वनी क्रमांक ७०१८४५२१०० उपलब्ध आहे.