Uncategorized

जिल्हा परिषद पालघर अधिकारी–कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय क्रीडा मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन२१ ते २३ जानेवारीदरम्यान सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विविध उपक्रम

जिल्हा परिषद पालघर अधिकारी–कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय क्रीडा मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
२१ ते २३ जानेवारीदरम्यान सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात विविध उपक्रम
पालघर (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद पालघर अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा मेळावा २०२५–२६ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा मेळावा २१, २२ व २३ जानेवारी २०२६ रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर येथे संपन्न होणार आहे.
या क्रीडा मेळाव्याचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. तालुका स्तरावर पार पडलेल्या क्रीडा स्पर्धांमधून विजयी ठरलेले तसेच जिल्हा स्तरावर निवड झालेले खेळाडू या मेळाव्यात सहभागी होणार असून, याच कालावधीत जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धा पार पडणार आहेत.
या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, संगीत खुर्ची, धावणे, रिले आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी आपली क्रीडा कौशल्ये व क्षमता सादर करणार आहेत.
क्रीडा स्पर्धांसोबतच शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कला–गुणांना व्यासपीठ मिळणार आहे.
दरम्यान, गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी व्यवसाय व पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर व कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व वराह पालन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहून शेतकरी व पशुपालकांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
संपूर्ण क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कृषी मेळाव्याचे आयोजन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा तसेच जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी कृषी विषयक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button