डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एकलव्य आयटीआय, पालघर येथे उत्साहात कार्यक्रम


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एकलव्य आयटीआय, पालघर येथे उत्साहात कार्यक्रम

पालघर (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी एकलव्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), पालघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री. सचिन परशुराम संखे यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. ‘जय वीर एकलव्य’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रश्मी म. आवटी यांनी प्रभावीपणे करत आंबेडकरांच्या कार्याचा व भारतीय राज्यघटनेतील योगदानाचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे नगरसेवक श्री. मुनाफ मेमन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे कौशल्यविकास करून प्रगती साधण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. सचिन संखे यांनी समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्य वक्ते दत्ताराम विश्राम गवस यांनी “शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश देत महाड सत्याग्रह, कामगार कायदे व सामाजिक न्यायाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी निदेशक निलेश भ. धोडी यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली