डोंबिवलीत बनावट ‘Telma AM’ औषधांचा पर्दाफाश; रुग्णांच्या जीवाशी खेळ, बिहार कनेक्शन उघड


डोंबिवलीत बनावट ‘Telma AM’ औषधांचा पर्दाफाश; रुग्णांच्या जीवाशी खेळ, बिहार कनेक्शन उघड
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
उच्च रक्तदाबावर अत्यंत प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘Telma AM’ या औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा डोंबिवलीतील मनपाडा पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत डोंबिवली आणि मुंबईतील दोन प्रमुख औषध वितरकांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात बनावट औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे.
‘श्री राम फार्मा’सह मुंबईतील वितरक अटकेत
गुप्त माहितीच्या आधारे मनपाडा पोलिसांनी छापेमारी करत डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’चा मालक पंकज उपाध्याये आणि मुंबईतील वितरक विवेक राय यांना अटक केली. आरोपींकडून नामांकित औषध कंपनीच्या नावाचे हुबेहूब लेबल व पॅकिंग असलेल्या बनावट ‘Telma AM’ गोळ्या जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे औषध वितरण साखळीत खळबळ उडाली आहे.
FDA चा धक्कादायक खुलासा; हृदयविकाराचा गंभीर धोका
Food and Drug Administration (FDA) कडून जप्त केलेल्या औषधांची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक माहिती समोर आली. बनावट गोळ्या शरीरात गेल्यानंतर वेळेवर विरघळत नाहीत आणि औषधाचा अपेक्षित परिणाम होत नाही.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना तातडीने औषधाचा परिणाम आवश्यक असतो. मात्र, या बनावट औषधांमुळे रक्तदाब नियंत्रणात न आल्यास रुग्णाला Heart attack किंवा Stroke येण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तपासात ‘बिहार’ कनेक्शन उघड
मनपाडा पोलिसांच्या प्राथमिक तपासात या रॅकेटचे धागेदोरे बिहार राज्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. ही बनावट औषधे नेमकी कुठे तयार होतात, त्यामागे कोणते उत्पादन केंद्र कार्यरत आहे आणि महाराष्ट्रातील इतर कोणत्या शहरांमध्ये हा साठा पोहोचला आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
या रॅकेटमध्ये आणखी काही बड्या वितरकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांना आवाहन
पोलिस व औषध प्रशासनाने नागरिकांना अधिकृत औषध विक्रेत्यांकडूनच औषधे खरेदी करण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद पॅकिंग किंवा कमी दरात मिळणाऱ्या औषधांबाबत तात्काळ तक्रार करण्यास सांगितले आहे.
या प्रकरणामुळे औषध विक्री व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.