Uncategorized

बोईसर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न.

बोईसर येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न


बोईसर : (प्रतिनिधी)कोकण मराठी साहित्य परिषद, बोईसर–तारापूर शाखेच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम डॉ. होमी भाभा विद्यालय, तारापूर टी.ए.पी.एस. येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रतिनिधी सुहास राऊत होते. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी मातृभाषा असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संतकाव्याच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत एक सूर गायन घेत उपस्थितांची दाद मिळवली.
शाखेचे अध्यक्ष व राज्य पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षक प्रा. संजय घरत यांनी वाचन, श्रवण, लेखन व संभाषण या भाषा कौशल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आपणच आपल्या भाषेचा विकास केला तरच मराठी भाषेचे खरे संवर्धन होईल, असे त्यांनी नमूद केले. कथाकथनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना त्यांनी प्रोत्साहन दिले.
माजी विस्तार अधिकारी सौ. अंजना सावे यांनी पुस्तक परिचय करून देत मानवाच्या अंतर्मनावरील उदाहरणांसह प्रभावी अभिवाचन सादर केले. उपाध्यक्ष अजित राणे यांनी मराठी भाषेबद्दल आवड निर्माण होण्यासाठी वाचनाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला व विविध उदाहरणांद्वारे आपले विचार मांडले.
यावेळी कोमसापचे सदस्य श्री. संदीप घरत यांचेही सहकार्य लाभले. वाचन ही एक कला असून उच्चार स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकातील धड्यांचे वाचन घेण्यात आले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका उमा गोखले तसेच गिरासे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता वरठा यांनी केले, तर आभारप्रदर्शन उषा गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button