कॅन-बाटलीत पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; अफवांवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाचा कडक निर्णय

.कॅन-बाटलीत पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी; अफवांवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाचा कडक निर्णय
पालघर |(प्रतिनिधी )दि. २७ मार्च
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या संभाव्य तुटवड्याबाबत समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी तातडीने कडक निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेट्रोलियम नियम, २००२ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. ज्वलनशील पदार्थांची अनियंत्रित विक्री टाळून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने हा महत्त्वाचा पाऊल उचलला आहे.
🔹 आदेशातील मुख्य निर्देश
पेट्रोल व डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच भरणे बंधनकारक
कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्रीस सक्त मनाई
सर्व पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे अनिवार्य
इंधन विक्रीच्या नोंदी नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे आदेश
⚠️ नियमभंग केल्यास कडक कारवाई
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
🛢️ प्रशासनाची तातडीची बैठक
अफवांचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी बीपीसीएल, आयओसीएल, एचपीसीएल, रिलायन्स आणि नायरा या तेल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स, पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष, हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच गॅस वितरण कंपन्यांच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली.
📢 नागरिकांना आवाहन
“जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
👉 सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून नागरिकांनी जबाबदारीने वर्तन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.