ब्राह्मणगावमध्ये आशा कार्यकर्त्यांकडून HPV लसीकरणाबाबत जनजागृती


ब्राह्मणगावमध्ये आशा कार्यकर्त्यांकडून HPV लसीकरणाबाबत जनजागृती

वाडा (प्रतिनिधी)
वाडा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे आशा कार्यकर्त्यांनी मुलींमध्ये एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवून लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी HPV लस अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत आशा ताईंनी किशोरवयीन मुली व त्यांच्या पालकांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले.
या मोहिमेदरम्यान आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत HPV विषाणू, त्यापासून होणारे आजार आणि लसीकरणाचे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. अनेक पालकांच्या मनातील गैरसमज दूर करत त्यांनी मुलींना वेळेवर लस घेण्याचे महत्त्व पटवून दिले.
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ब्राह्मणगावमध्ये HPV लसीकरणाचा प्रतिसाद वाढला असून, भविष्यात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी अशा जनजागृती मोहिमा आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.