जिजाऊंचे विचार अंगीकारून स्वाभिमानी समाज घडवा – केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल


जिजाऊंचे विचार अंगीकारून स्वाभिमानी समाज घडवा – केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल

जबलपूर (मध्यप्रदेश) : जिजाऊंचे प्रेरणादायी विचार महिलांनी आत्मसात करून स्वाभिमानी परिवार व सक्षम समाज निर्माण करावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे बुलंद विचार कुर्मी समाजाला अधिक सक्षम बनवतील, असेही त्यांनी नमूद केले.
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अधिवेशन व महिला राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच जबलपूर येथील दाऊ मॅरेज गार्डन, महाराजपूर येथे उत्साहात पार पडले. या वेळी बोलताना अनुप्रिया पटेल यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा आणि व्यसनाधीनता दूर करण्याचे आवाहन केले. महिला सक्षम व स्वयंपूर्ण झाल्यास समाजही स्वाभिमानी व प्रगतिशील बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनात देशभरातून विविध राज्यांतील पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये मंत्री आशिष पटेल, दशरथ पटेल, रामखिलावन पटेल, खासदार लता वानखेडे, ज्ञानेश्वर पाटील, राकेश सिंह तसेच महासभेचे राष्ट्रीय संरक्षक एल. पी. पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन प्रसाद, महासचिव उमेशकुमार पटेल, महिला अध्यक्षा लता ऋषी चंद्राकर, युवा अध्यक्ष धीरज पाटीदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, महासचिव जयेश शेलार पाटील, कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील, युवा अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा डॉ. शोभाताई गायकवाड, उद्योग प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष समीर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्रातील पुरोहित प्रशिक्षक विजय दलवी, डॉ. संदीप वरकुटे व संतोष भुसारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत डॉ. बाबूलाल सिंह यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यामध्ये अजित राऊत (बोईसर) यांना जीवनगौरव, तुकाराम पष्टे (विरार) यांना वैद्यकीय सेवा रत्न, हरिदास आखरे (बुलढाणा) यांना विश्वभूषण संत तुकाराम महाराज पुरस्कार, प्रमोद ठोंबे (पुणे) यांना छत्रपती संभाजी महाराज युवा रत्न, ॲड. गोपाल शेळके (रायगड) यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार, निवृत्ती न्याहारकर (नाशिक) व दिनेश दळवी (रत्नागिरी) यांना कृषी रत्न, संजय गायकवाड (नाशिक) यांना शिक्षण रत्न, विजय राव (टिटवाळा) यांना उद्योग रत्न, शाहीर उत्तम गायकर (इगतपुरी) यांना सांस्कृतिक कला रत्न आणि संदीप काळे (नाशिक) यांना प्रशासकीय रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या महाअधिवेशनात देशभरातील कुर्मी समाजातील विविध घटक—पटेल, पाटीदार, मराठा, कुनबी, कलबी, कुडुंबर, कूर्मि, महतो, गुर्जर, खंडायत, नायक, नायडू, कापू, चंद्राकर, कम्मा, ओक्का लिंगा, कुलमी आदी समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.