बोईसर मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’; नागरिकांसाठी सुवर्णसंधी
बोईसर मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’; नागरिकांसाठी सुवर्णसंधी
बोईसर :(प्रतिनिधी )नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे जलदगतीने आणि एकाच छताखाली तात्काळ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष उपक्रमाअंतर्गत बोईसर मंडळातील एकूण 25 महसूली गावातील नागरिकांसाठी एका भव्य शिबिराचे दिनांक 10/04/2026 रोजी डॉ. स. दा. वर्तक विद्यालय, विज्ञानगर (खैरापाडा) बोईसर, येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागरिकांना विविध महसुली सेवा “सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी” (Single Day Service Delivery) पद्धतीने एकाच दिवशी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबीर राबविण्यात येत आहे.
या विशेष शिबिरामध्ये खालील सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत:
१. विविध प्रकारचे दाखले वाटप
२. सातबारा (७/१२) उतारा अद्ययावत करणे
३. सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत पडताळणी व पट्टे वाटप
४. ई-मोजणी व पाणंद रस्त्यांबाबत कार्यवाही
५. महसुली अभिलेख दुरुस्तीसाठी विशेष हेल्प डेस्क
६. प्रलंबित फेरफार प्रकरणे तात्काळ निकाली काढणे
७. ॲग्रीस्टॅक (AgriStack) आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजना
८. तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही
९. सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचा लाभ
१०. पुरवठा विभागाशी संबंधित विषयांवर कार्यवाही
११. लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा
बोईसर परिसरातील नागरिकांसाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार असून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडाव्यात आणि शासनाच्या विविध योजनांचा व सेवांचा फायदा घ्यावा, असे आवाहन महसूल विभाग तसेच बोईसर मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.