तलासरी येथे मेंटर–मेंटी सभा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न


तलासरी येथे मेंटर–मेंटी सभा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न
तलासरी, (प्रतिनिधी)दि. 12 फेब्रुवारी 2026 –
कॉम. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मेंटर–मेंटी सभेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या सूचनेनुसार सदर कार्यक्रम डॉ. मोहनभाई पटेल सभागृहात शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या सभेस कला व वाणिज्य शाखेतील प्रथम (FY), द्वितीय (SY) व तृतीय (TY) वर्षातील सर्व मेंटी विद्यार्थी तसेच संबंधित मेंटर प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला व वाणिज्य शाखा मिळून 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. याशिवाय दोन्ही शाखांतील सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात प्राध्यापकांची भूमिका, शिस्तीचे महत्त्व व शैक्षणिक जबाबदाऱ्या यांवर सखोल विवेचन केले. विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीमागील संभाव्य कारणे, वर्गाबाहेर राहण्याच्या प्रवृत्तीमागील मानसिक, वैयक्तिक किंवा कौटुंबिक घटक यांची जाणीव ठेवून त्यांना समजून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून आवश्यक ते मार्गदर्शन करणे तसेच गरज भासल्यास पालकांशी संवाद साधणे ही मेंटर प्रणालीची महत्त्वाची बाजू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संवेदनशील व सकारात्मक दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास त्यांच्या वर्तनात व शैक्षणिक प्रगतीत अपेक्षित बदल साध्य होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. निलेश साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनातील शिस्त, नियमित अभ्यास व व्यक्तिमत्त्व विकास यांचा समन्वय साधण्याचे महत्त्व पटवून दिले. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये, सर्जनशीलता व चांगल्या सवयी आत्मसात करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सर्वांगीण दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा वैयक्तिक तसेच सामाजिक विकास साधता येईल, असे त्यांनी नमूद केले.
सभेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन शांतपणे व लक्षपूर्वक ऐकून घेतले. कार्यक्रमाचे एकूण वातावरण शिस्तबद्ध, सकारात्मक व प्रेरणादायी होते. नियोजित वेळेत कार्यक्रमाचा समारोप समाधानकारक रीतीने झाला. महाविद्यालय प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मेंटर–मेंटी संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.