राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. मनीषा कायंदे यांची नियुक्ती करा! – भूमिपुत्र एल्गार संघटनेची मागणी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. मनीषा कायंदे यांची नियुक्ती करा! – भूमिपुत्र एल्गार संघटनेची मागणी
मुंबई/प्रसाद भालेराव
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर विधानपरिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ‘भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आज निवेदन देऊन या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याची विनंती केली.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही केवळ एक घटनात्मक संस्था नसून राज्यातील कोट्यवधी महिलांच्या सुरक्षेचे आणि अस्मितेचे केंद्र आहे. सद्यस्थितीत या आयोगाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे, ज्यांच्याकडे केवळ राजकीय पद नाही, तर तळागाळातील महिलांच्या वेदनांची जाण आणि त्यांच्यासाठी लढण्याची धमक आहे. डॉ. मनीषा कायंदे यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कारकिर्दीत महिलांच्या प्रश्नांवर अत्यंत आक्रमक आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे. १९९२ च्या अयोध्येतील कारसेवेपासून ते लहानपणी वडिलांसोबत ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरांमध्ये काम करेपर्यंत, त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांचे कष्ट आणि समस्या जवळून अनुभवल्या आहेत.
मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट (Ph.D.) प्राप्त केलेल्या डॉ. कायंदे यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव क्लिष्ट सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरेल. मुंबई महानगरपालिकेची शिक्षण समिती आणि मुंबई पोलिसांच्या ‘महिला दक्षता समिती’वर काम करताना त्यांनी महिलांवरील अत्याचार आणि रेल्वे प्रवासातील समस्यांवर सातत्याने आवाज उठवला आहे. इतकेच नव्हे तर, ‘ग्लिडेन’ सारख्या पाश्चात्य डेटिंग ॲप्सनी जेव्हा भारतीय महिलांची चुकीची प्रतिमा मांडली, तेव्हा त्यांनी विधान परिषदेत त्याविरुद्ध प्रखर लढा देऊन भारतीय संस्कृतीचे रक्षण केले.
महिलांच्या हक्कांसाठी आजवर सुमारे १२५ हून अधिक आंदोलने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून करणाऱ्या डॉ. कायंदे यांनी अलीकडेच झालेल्या ‘धुलाई आंदोलना’मध्ये गरीब आणि कष्टकरी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रशासनाशी लढा दिला. कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता त्यांनी दिलेली ही साथ त्यांच्या संवेदनशील आणि निस्वार्थ नेतृत्वाचे जिवंत उदाहरण आहे.
प्रमोद पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज राज्याच्या कानाकोपऱ्यातील पीडित महिलांना कायद्याच्या किचकट प्रक्रियेपेक्षा एका खंबीर ‘आधारवडाची’ गरज आहे.
डॉ. मनीषा कायंदे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्तेपेक्षा ‘सेवेला’ अधिक महत्त्व दिले आहे. महिलांच्या प्रश्नांची त्यांना असलेली सखोल जाण आणि त्यांच्यातील संवेदनशीलता आणि तेवढाच आक्रमक बाणा पाहता, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करणे हा राज्यातील समस्त स्त्री-शक्तीचा सन्मान ठरेल.” असे यावेळी प्रमोद पवार यांनी सांगितले.