Uncategorized

पाण्यासाठी लाल बावट्यांचा संताप उसळला! ग्रामसेवकाला पाजले खड्यातले दूषित पाणी

पाण्यासाठी लाल बावट्यांचा संताप उसळला! ग्रामसेवकाला पाजले खड्यातले दूषित पाणी

विक्रमगड तालुक्यात पाणीटंचाईविरोधात माक्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचा आक्रमक इशारा

विक्रमगड/प्रसाद भालेराव
तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर भारताचा माक्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्ष आक्रमक झाला असून, मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी थेट ग्रामपंचायत केगवा-बालापूरच्या ग्रामसेवकाला आदिवासी बांधवांना प्यावे लागणारे खड्यातील दूषित पाणी पाजून प्रशासनाला धक्का दिला.
पाण्याच्या मागणीसाठी लाल बावटा पक्षाने यापूर्वी तब्बल २३ किलोमीटरचा लॉंग मार्च काढला होता. या मोर्च्यानंतर प्रशासनाने काही मागण्या मान्य केल्याचे सांगितले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने पक्षाचे पदाधिकारी संतप्त झाले.याच पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी विक्रमगड पंचायत समितीत धडकले. तेथे पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीर स्वरूपात कायम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी तालुका अधिकारी आणि ग्रामसेवकाला सोबत घेत बालापूर-केगवा-कराचिपाडा या गावांकडे मोर्चा वळवला.
गावात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आदिवासी समाजाला रोज प्यावे लागणाऱ्या पाण्याची भयावह वस्तुस्थिती दाखवली. ओहळाच्या काठावर खड्डा खोदून बाहेर काढले जाणारे दूषित, घाणेरडे आणि आरोग्यास घातक पाणी पाहून संताप आणखी भडकला. अखेर संतप्त पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तेच पाणी पाजत, “हेच पाणी जनता पिते, आता तुम्हीही प्या!” असा जाब विचारला.
यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम देत इशारा दिला की, २४ तासांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि अनोखे आंदोलन छेडले जाईल.
या आंदोलनात पक्षाचे पालघर जिल्हा सह-सेक्रेटरी कॉम. शेरू वाघ, तालुका सह-सेक्रेटरी कॉम. प्रकाश भोये, अखिल भारतीय किसान संघटना अध्यक्ष कॉम. दिनेश भेकरे, तसेच कॉम. विश्राम गिंभळ, कॉम. विजय मलावकर, कॉम. रुकेश खुताडे, कॉम. संदीप माडा, कॉम. हेमंत खरपडे, कॉम. अरुण भोरे, कॉम. नीलम धिंदा, कॉम. बंदेश वर्धा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना आजही खड्डे खोदून दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात लाल बावटा पक्षाने उग्र भूमिका घेतल्याने हा प्रश्न आता अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button