Uncategorized

वातानुकूलित लोकल सुरू करताना साधारण लोकल प्रवाशांच्या अडचणी ओळखा!भाडे द्वितीय दर्जाचे आत्तापासूनच का नाही?

वातानुकूलित लोकल सुरू करताना साधारण लोकल प्रवाशांच्या अडचणी ओळखा!
भाडे द्वितीय दर्जाचे आत्तापासूनच का नाही?
पालघर (प्रवासी संघ)मुंबईच्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही उपनगरीय मार्गांवर दररोज प्रचंड गर्दी असलेली लोकल सेवा सुरू आहे. प्रवासी दरवाज्याच्या पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करीत असून, यामध्ये पुरुषांबरोबरच महिला प्रवाशांचाही समावेश आहे. या अतिगर्दीमुळे अनेक वेळा प्रवासी तोल जाऊन चालत्या लोकलमधून खाली पडत असून, काही वेळा गंभीर जखमा तर काही वेळा मृत्यूचे प्रकारही घडत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील सर्व लोकल गाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईतील सर्व लोकल सेवा टप्प्याटप्प्याने वातानुकूलित करण्यात येईल आणि त्यासाठी कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मुंबईसाठी २३८ नवीन वातानुकूलित लोकल गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र, प्रत्यक्षात या सर्व २३८ वातानुकूलित लोकल सेवा सुरू होण्यासाठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वातानुकूलित लोकल सुरू होतील आणि सध्या आकारले जाणारे जास्त भाडे प्रवाशांकडून स्वीकारले जात राहील, ही बाब प्रवाशांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.
🔷 प्रतिक्रिया 🔷
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वे प्रशासनास विनंती आहे की, सर्व लोकल पूर्णतः वातानुकूलित होईपर्यंत थांबण्याऐवजी आत्तापासूनच वातानुकूलित लोकलचे भाडे साधारण लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या जवळपास निश्चित करण्यात यावे.
वातानुकूलित लोकल या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी उपयुक्त आहेत, मात्र त्यासाठी अवाजवी भाडे आकारले जात असल्याने सामान्य प्रवाशांमध्ये नाराजी आहे. भाडे पूर्णतः समान नसेल तरी किमान खालीलप्रमाणे तर्कसंगत दर निश्चित केल्यास प्रवाशांची स्वीकृती निश्चित मिळू शकते.
चर्चगेट – मरीनलाईन्स
साधारण लोकल एकेरी भाडे : ₹५
वातानुकूलित लोकल सुचवलेले भाडे : ₹१०
(सध्या आकारले जाते : ₹३५)
चर्चगेट – मरीनलाईन्स मासिक पास
साधारण लोकल : ₹१००
वातानुकूलित लोकल सुचवलेला पास : ₹३००
(सध्या आकारला जातो : ₹६२०)
विरार – चर्चगेट एकेरी भाडे
साधारण लोकल : ₹२०
वातानुकूलित लोकल सुचवलेले भाडे : ₹५०
(सध्या आकारले जाते : ₹११५)
विरार – चर्चगेट मासिक पास
साधारण लोकल : ₹३१५
वातानुकूलित लोकल सुचवलेला पास : ₹९५०
(सध्या आकारला जातो : ₹२२०५)
दिनांक २६ जानेवारीपासून विरार–चर्चगेट मार्गावर १२ वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू होत आहेत. मात्र, डहाणू मार्गावरील प्रवाशांच्या अपेक्षा लक्षात घेता, डहाणू लोकलच्या किमान काही साधारण फेऱ्या आणि १५ डब्यांची डहाणू लोकल सुरू करण्यात यावी. डहाणू मार्गासाठी वातानुकूलित लोकलची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रवासी मांडत आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा आवाज ऐकून योग्य व न्याय्य निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button