सफाळे पुर्व येथे राघोजी भांगरे–बिरसा मुंडा संयुक्त जयंती संपन्न





सफाळे पुर्व येथे राघोजी भांगरे–बिरसा मुंडा संयुक्त जयंती संपन्न
१७ नोव्हेंबर
सफाळे (एच लोखंंडे) आदिवासी हक्क व अधिकार विचार मंचतर्फे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नारोडा सफाळे पुर्व ता.जि.पालघर येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवर यांचा भव्य सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विशेषता: आदिवासी समाजातील विद्यार्थी, वसतिगृहातील युवक, निवृत्त अधिकारी, समविचारी समाज बांधव, स्थानिक नागरिक यांच्या मोठ्या प्रमाणावर संख्येने उपस्थित असलेल्या यांच्या साक्षीने कार्यक्रमाची सुरुवात. क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.
कार्यक्रमाचा उद्देश आणि प्रास्ताविक नितीन बोंबाडे यांनी सादर केले. यानंतर MPSC 2024 परीक्षेत आदिवासी समाजातून राज्यात उल्लेखनीय यश मिळवलेल्या धीरज दळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचारांनी नवी दिशा दिली. यावेळी त्यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतःचे तंत्र विकसित करा. प्रयत्नांत अपयश आले तरी सातत्य ठेवा. प्रश्नसंच ही उत्तम तयारीची गुरुकिल्ली आहे. सर्व विषयांवरील पुस्तकांपेक्षा एका विषयावर केंद्रित पुस्तकांचा अभ्यास अधिक फायदेशीर असतो. दररोजच्या सवयींमध्ये बदल करून जिथे शक्य असेल तिथे अभ्यास करत रहा,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मानसिक बळ दिले.
डॉ. सुनील पऱ्हाड यांनी राघोजी भांगरे, झलकरी, सिधू–कान्हू आणि तंट्यामामा यांच्या संघर्षमय इतिहासाचे दर्शन घडवत “आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करू नका, ती जगायला शिका” असे प्रेरणादायी आवाहन केले. त्यांनी सांगितले, बिरसा मुंडा हे फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक क्रांतीचे उद्गाते असल्याचे अधोरेखित केले.
ऍड. प्रियंका म्हस्कर यांनी विद्यार्थ्यां मार्गदर्शन साठी सदैव उपलब्ध राहण्याची ग्वाही दिली. डॉ. रामदास मराड यांनी स्पर्धा परीक्षा ही दीर्घकालीन ध्येयाची वाटचाल असल्यामुळे प्रलोभनांना बळी न पडता ध्येयावर एकाग्रता ठेवण्याचा सल्ला दिला. निवृत्त अधिकारी डी. बी. तडवी यांनी राज्य सेवा मुलाखत तयारीचे महत्व सांगितले, तर सहसचिव सदानंद गावीत यांनी बोगस आदिवासी विषयावर प्रकाश टाकत, “स्पर्धेत टिकायचे असेल तर कठोर मेहनतच पर्याय आहे,” असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात MPSC परीक्षेत यश मिळवलेल्या ऍड. प्रियंका म्हस्कर (2nd – ST) आणि धीरज दळवी (7th Rank – ST) यांचा मान्यवर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. कारण या दोघांनीही आपल्या संघर्षमय शैक्षणिक प्रवासातील अनुभव, सातत्य आणि यशाचे ‘सूत्र’ शैक्षणिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. तर संदीप साठे यांनी क्रांतिकारकांचा इतिहास समजावून उमजून सांगितला. विलास बेलकर (TTSF अध्यक्ष, पालघर) यांनी आदिवासी तरुणांना स्पर्धा परीक्षेत उतरून / परिक्षा देऊन पुढे जाण्याचे प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाला काशिनाथ वरठा, कृष्णा कांबळे, प्रमोद सांबरे, अविनाश भोईर, संतोष बोंबाडी, सुनील घोष, विनोद सुतार, मनोज वरठा, समृद्धी सांबरे (माजी सरपंच), सुनिल सांबरे, संजय भुयाळ, रामदास हरवठे, संतोष भुयाळ, मनोहर तुंबडा, रघुनाथ शेळका, चंद्रकांत दळवी, प्रकाश कोम यांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन सुधीर भोईर यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत घाटाळ यांनी केले. हा कार्यक्रम आदिवासी समाजातील तरुणांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणार असून, त्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि समाजकार्य, आपला समाज याकडे बघण्यासाठी नवीन दृष्टी देणारा एक भक्कम मार्गदर्शक म्हणून ठरणार आहे हि या कार्यक्रमाची समाज बांधव यांच्या कडे नोंद राहणार आहे.