अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला जव्हार तालुक्यातील विकासकामांचा आढावा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला जव्हार तालुक्यातील विकासकामांचा आढावा





पालघर (प्रतिनिधी)‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत जव्हार तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी घेतला.
बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी संदेश दुमाडा तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीपूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, साकुर येथे भेट देऊन आरोग्य सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ आणि रुग्णसेवेची पाहणी केली. त्यानंतर मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामाची प्रत्यक्ष स्थिती तपासून गुणवत्तेबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच लाभार्थ्यांना याचा कशाप्रकारे फायदा घेता येईल याबाबत चर्चा केली. तसेच घरकुलांची देखील पाहणी केली.
बैठकीदरम्यान घरकुल योजना, मनरेगा कामे, पाणीटंचाई उपाययोजना, ग्रामपंचायत कामकाज, सार्वजनिक शौचालय प्तसेच तालुक्यातील इतर सक्रिय विकासप्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामांना गती देऊन नियोजित वेळेत पूर्णत्वास नेण्याचे निर्देश अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – उमेद अंतर्गत महिलांचा 100 टक्के स्वयं-साहाय्य गटांमध्ये समावेश करून लखपती दीदी होण्यावर विशेष भर द्यावा.त्यासाठी आवश्यक नियोजन त्वरित राबविण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी “जव्हार तालुक्यातील सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करून समृद्ध पंचायत राज अभियानात तालुक्याने विशेष स्थान मिळवावे,” असे आवाहन करत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.