Uncategorized

मच्छीमारांना दिलासा मिळावा यासाठी दिल्लीत पाठपुरावा; डिझेल दरवाढीचा मुद्दा केंद्रात गाजला

मच्छीमारांना दिलासा मिळावा यासाठी दिल्लीत पाठपुरावा; डिझेल दरवाढीचा मुद्दा केंद्रात गाजला


पालघर (प्रतिनिधी) – बल्क कॅटेगरीमधून मिळणाऱ्या डिझेलच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे राज्यातील मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले असून याविरोधात महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाने सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत मच्छीमारांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मच्छीमार संघटनांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, दिनांक 30 मार्च 2026 रोजी नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे शिष्टमंडळ दिल्ली येथे गेले होते. या शिष्टमंडळाने कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकाराने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरजीतसिंग पुरी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने मच्छीमारांच्या अडचणी मांडत बल्क कॅटेगरीमधून त्यांना वगळण्याची मागणी केली, जेणेकरून डिझेलचे दर नियंत्रणात राहतील व उर्वरित मासेमारी हंगाम पूर्ण करता येईल. यावर मंत्री पुरी यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तत्काळ निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगितले. तसेच ऑईल कंपन्यांना सध्या मोठा तोटा होत असल्याने तातडीने सवलत देणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र 8 ते 10 दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य ते उपाय केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी शिष्टमंडळाला बोलावून मच्छीमारांची वस्तुस्थिती जाणून घेतली आणि तिन्ही खासदार या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करतील, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाच्या अध्यक्षा सौ. ज्योती राजेश मेहेर यांनी सांगितले की, मच्छीमारांच्या हितासाठी हा लढा पुढेही सुरू राहणार असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button