Uncategorized

नवी मुंबई विमानतळावरून २९ मार्चपासून ३० शहरांसाठी विमानसेवा सुरु

नवी मुंबई विमानतळावरून २९ मार्चपासून ३० शहरांसाठी विमानसेवा सुरु


मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)

गुरूवारी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) कंपनीने याचे प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची अधिकृत घोषणा केली.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. गुरूवारी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) कंपनीने याचे प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची अधिकृत घोषणा केली. यापूर्वी या विमानतळावरून १६ शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करणे शक्य झाले होते. २९ मार्चपासून विमानतळावरून प्रवाशांना देशांतर्गत ४६ शहरांपर्यंत पोहचता येईल. उन्हाळी सुट्टीसाठी २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत लागू होणाऱ्या पहिल्याच उन्हाळी वेळापत्रक एनएमएआय कंपनीने जाहीर केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातील व्यापारी, पर्यटन तसेच धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांकडे उड्डाणांची संख्या लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली आहे. यात विशेषतः दिल्ली (दररोज ९ उड्डाणे), गोवा (७), बेंगळुरू (६) आणि कोची (५) या शहरांकडे सर्वाधिक उड्डाणे नियोजित आहेत. याशिवाय हैदराबाद, कोलकाता, लखनौ, वाराणसी आणि इंदूर या शहरांनाही नियमित हवाई सेवा मिळणार आहे.या उन्हाळी वेळापत्रकात इंडिगो, आकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या तीन विमान कंपन्या अतिरिक्त उड्डाणे चालविणार असून, त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायांची संख्या वाढणार आहे.

विमानतळावरील हवाई वाहतूक आठवड्याला सुमारे १,०९२ उड्डाणांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर दररोज सरासरी १५६ उड्डाणे होतील.प्रारंभी सुरूवातीला दररोज २२ उड्डाणे असताना एप्रिल महिन्यापर्यंत ती वाढून ७८ उड्डाणांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी या विमानतळावरून २५ डिसेंबरला व्यावसायिक सेवा सुरू झाल्यानंतर विमानतळाने प्रवासी मागणी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला.

नवी मुंबई विमानतळ परिसरात लेझर लाईटवर बंदी?
नवी मुंबई विमानतळावरून कोणत्या ३० शहरांमध्ये जाऊ शकाल…आग्रा, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (डाबोळीम), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरा सर), हुबळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील नाव देण्याचा मार्ग मोकळा, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच प्रस्ताव
नवी मुंबई विमानतळाच्या या विस्तारामुळे टियर-१ आणि टियर-२ शहरांमधील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पर्यटन, व्यावसायिक प्रवास आणि धार्मिक स्थळांना जाणाऱ्या प्रवाशांना थेट उड्डाणांची सुविधा मिळणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होईल.मुंबई महानगर प्रदेश हा देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांपैकी एक असल्याने वाढत्या प्रवासी संख्येला प्रतिसाद देण्यासाठी हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताणही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक असून, अत्याधुनिक टर्मिनल्स, दुहेरी धावपट्टी आणि पर्यावरणपूरक सुविधा यामुळे तो भविष्यातील महत्त्वाचा हवाई केंद्रबिंदू ठरणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे ९ कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता या विमानतळात असेल अशी माहिती सुत्राकडून मिळत आहे.आज पर्यंत ( दि. बा. पाटील) आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी सरकार कडून घोषणा करूनही नामांतर प्रलंबित आहे. आणखी किती वेळ भूमिपुत्रांना अपेक्षित ठेवणार अशी सर्व स्तरावरून चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button