Uncategorized

कासा उपजिल्हा रुग्णालयात मद्यधुंद कारभारकर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचे मद्यप्राशन; रुग्णांच्या जीवाशी खेळ

कासा उपजिल्हा रुग्णालयात मद्यधुंद कारभार
कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचे मद्यप्राशन; रुग्णांच्या जीवाशी खेळ
डहाणू /प्रसाद भालेराव
पालघर जिल्ह्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत “रुग्णसेवा की मद्यसेवा?”असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. औषध भांडार विभागात कार्यरत असलेला वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी कर्तव्यावर असताना शासकीय नियमांना फाट्यावर मारत चारोटी नाका येथील एका नामांकित हॉटेलमध्ये बसून बेधडक मद्यप्राशन करत असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शासकीय सेवा नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना रुग्णालय प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप होत आहे.
उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सायवन, गंजाड, तवा, सोमटा, धुंदलवाडी, बहारे, तलवाडा तसेच धानिवरी आरोग्य उपकेंद्रासह या भागात तब्बल दीड लाखांहून अधिक आदिवासी नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचा कणा आहे. मात्र याच रुग्णालयातील कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळत असतील, तर रुग्णांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल निर्माण झाला आहे.
मद्यधुंद अवस्थेत औषध वितरण किंवा आरोग्य सेवा दिली गेली, तर चुकीचे औषध, चुकीचा डोस किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोणाची? जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक की थेट आरोग्य विभाग?धक्कादायक बाब म्हणजे, लाखो रुपये मासिक वेतन घेणाऱ्या एम.बी.बी.एस. डॉक्टरांची फौज उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) तपासणी नवशिक्या डॉक्टरांच्या हाती सोपवली जात असल्याचेही समोर येत आहे.
हा प्रकार केवळ एका कर्मचाऱ्याचा नसून संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे द्योतक आहे. तातडीने चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई, वैद्यकीय अधीक्षकांवर प्रशासकीय जबाबदारी निश्चित करणे आणि रुग्णालयातील अनागोंदी कारभारावर अंकुश लावणे अत्यावश्यक आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावर “चौकशीचे आदेश” देऊन हात झटकण्याची नामुष्की आरोग्य प्रशासनावर येईल, यात शंका नाही.

हा आदिवासी बहुलभाग असून, रुग्णालयात मद्य प्राशन करून अशा पद्धतीने कर्मचारी कर्तव्य बजावत असेल तर हा आदिवासी रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हा विषय गंभीर असून सदर कर्मचाऱ्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल
मनोज पारधी
डहाणू तालुकाध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी

या घटनेची माहिती मिळताच तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांकडून थातूर-मातूर लेखी खुलासा प्राप्त झाला असून तो अमान्य करण्यात आला आहे. पुढील खुलासा आल्यानंतर कर्मचाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल
सचिन वाघमारे
वैद्यकीय अधीक्षक-उपजिल्हा रुग्णालय कासा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button