Uncategorized

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये “हिंद दी चादर” कार्यक्रमाचे भव्य आयोजन

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये “हिंद दी चादर” कार्यक्रमाचे भव्य आयोजन

पालघर दि १२ जानेवारी (प्रतिनिधी ): शिख धर्माचे नववे गुरू, “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय नांदेडमध्ये एकत्र येणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि मानवतेचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा त्याग, बलिदान आणि मानवाधिकार रक्षणासाठी दिलेल्या शहीदीचा गौरवशाली इतिहास देश-विदेशात पोहोचविणे हा या समागमाचा मुख्य उद्देश आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी देश – विदेशातील सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, नांदेड शहर ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे.
अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांना अभिवादन करत भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभरात “हिंद दी चादर” कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे विचार आणि त्यांनी दिलेला संदेश तळागाळापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्रात नांदेड, नवी मुंबई आणि येथे हे भव्य कार्यक्रम होत आहेत. अन्यायकारक शक्तीला शरण न जाता त्यांनी राष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान दिले. ‘राष्ट्र सर्वात श्रेष्ठ आहे आणि शांतीचा संदेश देणे हेच खरे सर्वांचे कर्तव्य’ ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.”
अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी सांगितले की, “श्री गुरु तेग बहादूर साहिब जी हे केवळ शीख समाजाचे गुरू नव्हते, तर मानवाधिकारांचे रक्षक होते. विविध समाजांना एकत्र आणण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमातून गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे महाराष्ट्राशी असलेले अतूट नाते अधोरेखित होणार आहे.”
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई , नांदेड,ठाणे जिल्हा प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक आणि सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयी-सुविधांबाबत विशेष तयारी करण्यात येत असून, भाविकांसाठी सर्वंकष सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
न्यायाचा संदेश, मानवतेचा आदर्श आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरव करणारा हा समागम नवी मुंबई आणि नांदेडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button