Uncategorized

डहाणू तालुक्याने सलग चौथ्यांदा पटकावला सन्मान चषकजिल्हा परिषद अधिकारी–कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

डहाणू तालुक्याने सलग चौथ्यांदा पटकावला सन्मान चषक
जिल्हा परिषद अधिकारी–कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न


पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्हा परिषदेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध खेळांत उत्कृष्ट कामगिरी करत डहाणू तालुक्याने सलग चौथ्या वर्षी सन्मान चषकावर आपले नाव कोरले. या यशात महिलांचा सहभाग व त्यांनी मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय ठरले.
दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धा तीन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण आणि खेळभावनेच्या वातावरणात पार पडल्या. जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर, तसेच सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया यांनी खेळाडूंच्या किटचे (शर्ट व ट्राउझर्स) प्रायोजकत्व स्वीकारले होते. तसेच तीन दिवस चाललेल्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) देखील युनियन बँकेतर्फे करण्यात आले, त्यामुळे स्पर्धांचा उत्साह अधिकच वाढला.
स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, रिले, संगीत खुर्ची, रांगोळी आदी विविध क्रीडाप्रकारांचा समावेश होता. या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, खेळभावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी स्पर्धा हसत–खेळत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल सर्व सहभागींचे अभिनंदन केले. भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच क्रीडा स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे त्यांनी विशेष आभार मानले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाचे कौतुक करत, कार्यालयीन कामासोबतच शारीरिक तंदुरुस्ती व सांघिक भावना जपणाऱ्या उपक्रमांना महत्त्व देण्याचे आवाहन केले.
स्पर्धांतील सर्व विजेत्या खेळाडूंना व संघांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व स्पर्धकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते प्रत्येकी १,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यात आले.
यावेळी क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान दिलेल्या नियोजन समितीचे सदस्य, पंच व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button