Uncategorized

पालघर पोलिसांकडून गांजाची साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई२.९६५ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

पालघर पोलिसांकडून गांजाची साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई
२.९६५ किलो गांजा जप्त, दोघांना अटक
पालघर (प्रतिनिधी) :
पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या धोरणानुसार पालघर जिल्हा पोलिसांनी गांजाची साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर यशस्वी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी सतर्क आहेत. त्यानुसार दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मौजे संभा येथील इराणी फार्म वाडीमध्ये एक इसम गांजाची विक्री करण्यासाठी साठवणूक करून ठेवत आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अमगाव चौकी हद्दीतील संबंधित घरावर छापा टाकला. छाप्यात २.९६५ किलो वजनाचा, फिकट तपकिरी रंगाचा, पाने, फुले, काड्या व बिया असलेला, उग्र वासाचा गांजासदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब) प्रमाणे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
मोहम्मद चंगेझ हाजी अब्दुल रौफ शेख उर्फ मोईनुद्दीन शेख (वय ३६), रा. फॉरेस्ट ऑफिसजवळ, संजान, ता. उंबरगाव, जि. बलसाड
अतिश गणेश कुमरे (वय २८), रा. स्वप्नलोक माणिक अपार्टमेंट, उंबरगाव, जि. बलसाड
दोन्ही आरोपींना दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सिधे, तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तलासरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व फॉरेन्सिक पथकाच्या सहकार्याने पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button