जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धां एकना आज, 31 जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धा अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर, तसेच सर्व विभागप्रमुख व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक मुकेश कुमार बब्बर व सहायक महाप्रबंधक सावन शिव यांनी देखील उपस्थित राहून स्पर्धांना शुभेच्छा दिल्या. युनियन बँक ऑफ इंडियाने या क्रीडा स्पर्धांसाठी व्हिडिओग्राफी तसेच खेळाडूंच्या किटचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, खेळाडूंना शर्ट व ट्राउझर्स देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद मुख्यालय व मोखाडा तालुका यांच्यातील कबड्डी सामन्याने स्पर्धांचा शुभारंभ झाला. जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
या स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, संगीत खुर्ची, कॅरम, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, धावणे, रिले, रांगोळी यांसह विविध क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खेळभावना, संघभावना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
सोमवारी दि. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी विजेत्या संघ व खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असून, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी क्रीडा स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे आभार मानले. एकाच ठिकाणी सर्व खेळांचे आयोजन झाल्याने खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तणावातून मुक्ती देणारा हा उपक्रम असून, अशा क्रीडा स्पर्धांमुळे आरोग्य, मनोबल व कार्यक्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, वाडा तालुक्यातील एका खेळाडू विद्यार्थ्याकडे योग्य खेळाचे जोडे व कपड्यांची कमतरता असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याला नवीन स्पोर्ट्स शूज व आवश्यक खेळाचे कपडे प्रदान केले, ज्यामुळे त्याच्या खेळातील उत्साहाला नवी ऊर्जा मिळाली.