Uncategorized

मान येथे विराज प्रोफाइल प्रकल्पाविरोधात जनआक्रोश; ८ एप्रिलची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी

मान येथे विराज प्रोफाइल प्रकल्पाविरोधात जनआक्रोश; ८ एप्रिलची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी


पालघर (प्रतिनिधी) – मान ग्रामपंचायत हद्दीत प्रस्तावित विराज प्रोफाइल प्रा. लि. यांच्या नव्या औद्योगिक प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला आहे. कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प सध्याच्या तुलनेत सुमारे ११ पट मोठा असून, ८ एप्रिल रोजी आयोजित जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या मते, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता आहे. परिसरातील जलस्रोत आधीच दूषित झाले असून, कंपनीमुळे भूगर्भातील पाणी व बोअरवेलमधील पाणी लालसर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, प्रक्रिया केलेले रासायनिक पाणी कुठे सोडले जाणार, याबाबतही स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मान ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत येत असल्याने, ग्रामसभेच्या संमतीशिवाय प्रकल्प राबविणे नियमबाह्य असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी स्पष्ट केले. ग्रामसभेमार्फत या प्रकल्पाला आधीच विरोध नोंदविण्यात आला आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, विराज कंपनीने यापूर्वीही बोईसर परिसरात उद्योग उभारताना प्रदूषण केले असून, लाखो लिटर पाणी जमिनीत सोडल्याने भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. तसेच, कंपनीकडून रोजगाराच्या मोठ्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. “३५००/ हजार रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत,” असा आरोप करण्यात आला.
या प्रकल्पासाठी सुमारे १०३ एकर जागेवर विस्तार प्रस्तावित असून, चार महसुली गावांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. “ग्रामपंचायत परिसरातील एकाही स्थानिकाला कामावर घेतले नाही, त्यामुळे या प्रकल्पाचा आम्हाला काहीच फायदा नाही,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
जनसुनावणी ही संबंधित कंपनीच्या जागेत घेणे योग्य नसून, ती शासकीय ठिकाणी पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, सुनावणी तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बहुजन विकास आघाडी, मनसे, शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी, कुणबीसेना, भूमिसेना आदी विविध पक्ष-संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. प्रशांत पाटील, सचिन लोखंडे, डिमेलो सर,अशोक शिंगडा, समीर मोरे, अविनाश पाटील, भावेश चुरी, कुंदन संखे ,राहुल पाटील व हेमंत पाटील वकील ,कांचन काटकर,अंजली भावर यांसह अनेक नेत्यांनी प्रकल्पाविरोधात भूमिका मांडली.
तसेच, विराज प्रोफाइल विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. येत्या ४ तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताला धक्का पोहोचवणारा प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button