जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महा-साधना सप्ताह’चा प्रारंभ; ४ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महा-साधना सप्ताह’चा प्रारंभ; ४ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक


पालघर (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महा-साधना सप्ताहा’चा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी भूषविले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि. २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किमान ४ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले, “महा-साधना सप्ताह हा केवळ औपचारिक उपक्रम नसून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. GOT कर्मयोगी पोर्टलवरील कोर्सेसचा उपयोग कौशल्यविकासासाठी करून घ्यावा. मोबाईलवरील अनावश्यक वापर टाळून हा वेळ ज्ञानवृद्धीसाठी वापरल्यास कामात सकारात्मक बदल दिसून येईल.”
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी (सामान्य) रणजीत देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) इजाज अहमद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महा-साधना सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाच्या अवर सचिवांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, सर्व संबंधितांनी GOT कर्मयोगी पोर्टलवरील निर्धारित अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असून, अधिनस्त कार्यालयांनाही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे.