कॉ. गोदावरी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत गुंतवणूकदार जागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन



तलासरी(प्रतिनिधी)
कॉ. गोदावरी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत गुंतवणूकदार जागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
आदिवासी प्रगती मंडळ संचलित, कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथील वाणिज्य विभागाच्या माध्यमातून ‘गुंतवणूकदार जागृती कार्यक्रमांतर्गत ‘ विद्यार्थ्यासाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी 11.०० ते दुपारी 1.:30 वाजेपर्यंत घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या गुंतवणूकदार संरक्षण निधीचे, डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, मा. श्री.रमेश जाधव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गुंतवणूक जागृतीचे स्वरूप आणि महत्व या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी गुंतवणुकीचे महत्त्व, आर्थिक नियोजन आणि उद्दिष्टे निश्चित करणे, विविध प्रकारच्या गुंतवणुका, जोखीम व्यवस्थापन, फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी, SIP (Systematic Investment Plan) चे फायदे, विम्याचे महत्त्व, आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण, निवृत्ती नियोजन, महागाईचा परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भांडवल बाजारात गुंतवणूक करताना परिश्रम घेवून व्यवसायाचा मुलभूत अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसून दीर्घ काळात गुंतवणुकीपासून चक्रीय लाभ प्राप्त करण्यासाठी गुंतवणुकीत सातत्य असणे महत्वाचे आहे. लगेच लाभ देणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजनापासून गुंतवणूकदाराने दूर राहणे महत्वाचे आहे यावर सरांनी बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, उपप्राचार्य प्रा. निलेश साळवे, तसेच वाणिज्य विभागाचे प्रा. रितेश रायचाना आणि प्रा. महेश माळवदकर उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्रास १८२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. प्रा. निलेश साळवे यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत प्रा. महेश माळवदकर यांनी केले. प्राचार्य डॉ. राजपूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी भविष्य सुकर करण्यासाठी गुंतवणूक तंत्र अभ्यासणे महत्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रितेश रायचना यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व भविष्यात अशा प्रकारच्या उपयुक्त मार्गदर्शन सत्रांची अपेक्षा व्यक्त केली.