मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’मुळे पालघर जिल्ह्यात शेतमाल वाहतुकीला चालना
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’मुळे पालघर जिल्ह्यात शेतमाल वाहतुकीला चालना
पालघर(प्रतिनिधी), दि. १६ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सहज पोहोच मिळावी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंमलबजावणीला पालघर जिल्ह्यात गती मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून बारमाही शेतरस्ते तयार करणे आणि विद्यमान पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे.
सध्या शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर, कापणी यंत्रे तसेच इतर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतापर्यंत मजबूत व दर्जेदार रस्ते असणे अत्यावश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार महसूल विभागामार्फत ही स्वतंत्र योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी, समन्वय आणि देखरेख जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जात आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समितीसोबतच जिल्हास्तरीय कार्यकारी समिती आणि विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखून कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्री व पाईप पुरवठ्याचे दर निश्चित करण्यासाठी नोंदणीकृत यंत्रणाधारकांकडून विधानसभा क्षेत्रनिहाय दरपत्रक मागविण्यात येत आहे. यासाठी “mahatenders.gov.in” या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शेतरस्त्यांची गुणवत्ता काटेकोरपणे तपासली जाणार आहे. तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वृक्षलागवड केली जाणार असल्याने पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
“मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.