NSS स्वयंसेवकांचे कोळगावमध्ये श्रमदानातून ग्रामविकासपद्मश्री जिव्या सोमा मशे आयटीआय वाणगावच्या विद्यार्थ्यांचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न




NSS स्वयंसेवकांचे कोळगावमध्ये श्रमदानातून ग्रामविकास
पद्मश्री जिव्या सोमा मशे आयटीआय वाणगावच्या विद्यार्थ्यांचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न


पालघर :(प्रतिनिधी )पद्मश्री जिव्या सोमा मशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव (आदिवासी) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर ग्रामपंचायत कोळगाव, ता. पालघर, जि. पालघर येथे दिनांक ९ मार्च ते १५ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरात सुमारे ७५ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत ग्रामविकासासाठी श्रमदान केले.
शिबिराचे उद्घाटन कोळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री. सचिन परशुराम संखे उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. जितेंद्र पवार, उपसरपंच श्री. किरण संखे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघरचे श्री. अनंत भंगाळे, कर्मचारी श्री. रोशन संखे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. प्रशांत बोकंद यांच्यासह श्री. अतिश बारी, श्री. प्रशांत पिंपळे, श्री. वैभव भोईर, श्री. सोमा बेंडकोळी, श्री. एस. जी. घरत, श्री. रोहित राऊत, श्री. सिद्धार्थ विंदे, श्री. एस. बी. खताळ, श्री. टी. पी. चौधरी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी श्री. प्रशांत बोकंद यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. उद्घाटक सरपंच श्री. कुणाल पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की NSS च्या निवासी श्रमसंस्कार शिबिरासाठी कोळगाव या गावाची निवड झाल्याचा ग्रामस्थांना अभिमान आहे. “NOT ME BUT YOU” हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांना समाजसेवेची प्रेरणा देणारे असून शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य श्री. सचिन परशुराम संखे यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावना, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करणारी प्रभावी योजना आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातील वास्तव परिस्थिती समजते आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते वाणगाव आयटीआयचे प्र.प्राचार्य श्री. चंदन बंजारा यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगताना महात्मा गांधी यांच्या विचारातून NSS ची संकल्पना विकसित झाल्याचे सांगितले. स्वयंसेवक ग्रामपातळीवर सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
सात दिवसीय शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले. ग्रामस्वच्छता अभियान राबवून मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. घरोघरी जाऊन विद्युत दुरुस्ती आणि प्लंबिंगची कामे करून ग्रामस्थांना मदत करण्यात आली. गावातील पथदिव्यांची दुरुस्ती करून प्रकाश व्यवस्था सुधारण्यात आली. परिसरातील झाडांना गेरू व चुना लावून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करण्यात आले.
तसेच ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी शेड उभारण्यात आले, शोषखड्डे तयार करून पाणी व्यवस्थापनाची कामे करण्यात आली. गावाचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी वेल्डिंगची कामे करण्यात आली तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची दुरुस्ती व देखभाल करण्यात आली. पर्यावरण व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना जागरूक करण्यात आले.
शिबिरादरम्यान जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. अनिल सदाफुले यांनी शिबिराला भेट देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाडा चे प्राचार्य श्री. रोहन चुंबळे यांनी शिबिराला भेट देऊन स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची पाहणी करून त्यांचे कौतुक केले.
समारोप प्रसंगी सरपंच श्री. कुणाल पाटील यांनी स्वयंसेवकांनी सात दिवसांत केलेल्या श्रमदानाचे कौतुक करत ग्रामस्वच्छता, पथदिवे दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, शोषखड्डे तयार करणे व ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती यांसारख्या कामांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी NSS उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक निधीतून १०,००० रुपयांची देणगी जाहीर केली. तर श्री. योगेश पाटील यांनीही ५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.
समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. सचिन परशुराम संखे यांनी सांगितले की या शिबिरामुळे स्वयंसेवकांना समाजसेवेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. ग्रामस्वच्छता, पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन यांसारखी महत्त्वाची कामे पूर्ण झाली असून “NOT ME BUT YOU” या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.
अशा प्रकारे राष्ट्रीय सेवा योजनेचे हे निवासी श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, श्रमसंस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.