ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व पाणी व्यवस्थापनाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न


ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व पाणी व्यवस्थापनाबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
पालघर :(प्रतिनिधी )जिल्हा परिषद पालघर, सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (सीईपीटी युनिव्हर्सिटी) तसेच एचडीएफसी बँकेच्या ‘परिवर्तन’ उपक्रमाच्या सहकार्याने पालघर व डहाणू तालुक्यातील निवडलेल्या ३० ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व पाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ११ मार्च २०२६ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे लेखाधिकारी पांडुरंग कोरडे, सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (सीईपीटी युनिव्हर्सिटी)चे ध्रुव भावसार, केंद्रप्रमुख असीम मन्सूरी, उपासना यादव तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी, “गाव पातळीवर उभारण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचे नियमित संचालन व देखभाल ग्रामपंचायतींनी जबाबदारीने करणे आवश्यक असून त्यातून गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मोठी मदत होईल,” असे सांगितले.
कार्यशाळेत ग्रामपंचायतींना आदर्श बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून विकास साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), प्रधानमंत्री आवास योजना, विकसित भारत अभियान, रोजगार हमी योजना, आजीविका अभियान (ग्रामीण), माझी वसुंधरा अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
तसेच घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता सुविधा टिकवून ठेवणे आणि ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचे समन्वयाने नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनीही आपले अनुभव व सूचना मांडल्या.
या कार्यशाळेस जिल्हा व तालुकास्तरीय पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.