मुलुंड कॉलनीत ओव्हरलोड डंपरने तरुणाला चिरडले; जागीच मृत्यू
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पाप जीवाचा बळी


मुलुंड कॉलनीत ओव्हरलोड डंपरने तरुणाला चिरडले; जागीच मृत्यू
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी एका निष्पाप जीवाचा बळी
दि. 10 जानेवारी 2026 | मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील
मुलुंड कॉलनी परिसरात ओव्हरलोड डंपरांचा धुमाकूळ सुरूच असून, त्याचा भीषण परिणाम आज पुन्हा एकदा नागरिकांना भोगावा लागला आहे. मुलुंड पश्चिम येथील भाजी मार्केटजवळील गुरु गोविंदसिंग मार्गावर (G.G.S. मार्ग) ओव्हरलोड डंपरखाली येऊन 34 वर्षीय तरुणाचा जागीच चिरडून मृत्यू झाला.
हा मृत्यू अपघात नसून, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आणि निष्काळजीपणाचा थेट परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
ओव्हरलोड डंपरांची बेफाम वाहतूक
भांडुप कॉम्प्लेक्स व हाईलँड पार्क परिसरात सुरू असलेल्या मोठ्या बांधकाम कामांमुळे लिंक रोड बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व जड व ओव्हरलोड डंपर गुरु गोविंदसिंग मार्गाने LBS मार्गाकडे वळवले जात आहेत.
हा मार्ग अरुंद, उतार-चढावाचा, तसेच पूर्णपणे रिहायशी असून येथे शाळा, बाजारपेठा आणि दाट लोकवस्ती आहे. अशा ठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक नागरिकांच्या जीवासाठी मोठा धोका ठरत आहे.
महिनाभर आधीच इशारा देण्यात आला होता
सामाजिक कार्यकर्ते गोल्डी शर्मा यांनी या धोकादायक परिस्थितीबाबत तब्बल एक महिना आधीच T-वॉर्ड कार्यालयात लेखी व तोंडी तक्रारी करून प्रशासनाला इशारा दिला होता.
ओव्हरलोड डंपरांमुळे अपघात होत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते.
ही बाब T-वॉर्डचे सहाय्यक आयुक्त (P.G.) यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली होती. मात्र, वारंवार तक्रारी करूनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
यापूर्वीही घडल्या होत्या गंभीर घटना
▪️ जयहिंद / जय शास्त्री नगर, मुलुंड पश्चिम – G.G.S. मार्गावर सुमारे एक महिन्यापूर्वी डंपरने मोटरसायकलस्वाराला धडक दिली.
▪️ काही दिवसांपूर्वी अमर नगर जंक्शन, मुलुंड पश्चिम येथे डंपर पलटी झाला होता.
इतक्या घटना घडूनही प्रशासनाने दुर्लक्षच केले, असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
आजचा दुर्दैवी प्रसंग
दिनांक : 10/01/2026
वेळ : दुपारी सुमारे 1 वाजता
स्थळ : भाजी मार्केटजवळ, G.G.S. मार्ग, मुलुंड पश्चिम
ओव्हरलोड डंपरखाली येऊन 34 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.
जबाबदार कोण?
▪️ वारंवार तक्रारी असूनही कारवाई न करणारे T-वॉर्ड अधिकारी
▪️ ओव्हरलोड डंपर चालवणारे ठेकेदार
▪️ वाहतूक नियंत्रण करण्यात अपयशी ठरलेली संबंधित यंत्रणा
नागरिकांची तातडीची मागणी
▪️ ओव्हरलोड डंपरांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी
▪️ रिहायशी भागातून डंपर वाहतूक त्वरित बंद करावी
▪️ डंपरांसाठी सुरक्षित व पर्यायी मार्ग तात्काळ निश्चित करावा
▪️ संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावी
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
आता तरी जबाबदारी निश्चित होणार का?
की पुन्हा एखाद्या निष्पाप जीवाची किंमत मोजावी लागणार आहे?