Uncategorized

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३’ व गृहप्रवेश कार्यक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यात ‘घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३’ व गृहप्रवेश कार्यक्रम

पालघर (प्रतिनिधी)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी “घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३ तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम” जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. याच कालावधीत महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला स्वयंसहायता गटांची प्रभात फेरी, लोकजागृती मोहीम व महिलांची हिमोग्लोबिन (HB) तपासणी देखील आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा – २ अंतर्गत पालघर जिल्ह्यास ६०,५७४ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून १०० टक्के लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत १०,४७८ घरकुलांचे लक्षांक प्राप्त होऊन त्यांनाही १०० टक्के मंजुरी देण्यात आली आहे.

तथापि, PMAY-G टप्पा–२ अंतर्गत १३,८६१ तसेच PM-JANMAN अंतर्गत ३,३२२, असे एकूण १७,१८३ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित होऊनही अद्याप घरकुल बांधकाम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३” राबवून या सर्व लाभार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून संवाद साधण्यात येणार आहे.

या अभियानाचा मुख्य उद्देश लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे, घरकुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे व मुदतीत घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम देखील याच कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. PMAY-G टप्पा–२ अंतर्गत १८,९७२ व PM-JANMAN अंतर्गत २,९२३, अशी एकूण २१,८९५ घरकुले पूर्ण झाली असून या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून नियोजित पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उमेद (MSRLM) योजनेद्वारे पात्र महिला स्वयंसहायता गटांना बँक कर्ज वितरण, बचत गटांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे, ‘लखपती दीदी’ संकल्पना, महिला उत्पादक संस्था स्थापन करणे तसेच अनिमिया मुक्त गाव संकल्पना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.

यानुसार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात महिलांची प्रभात फेरी आयोजित करून बॅनर व मौखिक घोषणांच्या माध्यमातून विविध योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच महिलांची आरोग्य तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार आहे.

प्रकल्प संचालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, डॉ.रूपाली सातपुते यांनी सांगितले की, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांनी विशेष नियोजन केले असून प्रथम हप्ता मिळूनही बांधकाम न सुरू केलेल्या घरकुल लाभार्थ्यांना १०० टक्के क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष भेट देतील, याची खात्री केली जाणार आहे.

सर्व लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व गावस्तरीय अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button