मायखोप गावातील होळी-धुळवड उत्सवात लेखक-कवींचा सन्मान

मायखोप गावातील होळी-धुळवड उत्सवात लेखक-कवींचा सन्मान
केळवारोड, (प्रतिनिधी)दि. ३ : पालघर जिल्ह्यातील मायखोप गावात होळी-धुळवड उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आगरी परंपरा व संस्कृतीनुसार होळीका उभारण्यात आली. यावेळी जमलेल्या धवलारिणींनी पारंपरिक गीते गात होळीकेला हळद लावून वातावरण भक्तिमय व उत्साही केले. सुरेल आवाजात सादर झालेल्या आगरी गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे लेखक-कवींचा करण्यात आलेला सन्मान होय. विशेष निमंत्रित लेखक-कवी संजय पाटील (मायखोपकर) आणि कवी महेंद्र रामचंद्र पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व मानाची टोपी देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण स्तरावर साहित्यिकांना कमी प्रोत्साहन मिळते, अशा पार्श्वभूमीवर समाजसेवक रामदास पाटील यांनी भव्य होळी उत्सवात हा सन्मान सोहळा आयोजित करून साहित्य क्षेत्राला दिलेला मान विशेष उल्लेखनीय ठरला.
सन्मानाबद्दल साहित्यिक संजय पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच या उपक्रमाला प्रसिद्धी देणाऱ्या सर्व वृत्तपत्रे व पत्रकार बंधूंचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
पालघर जिल्ह्यातील आगरी समाजात होळी-धुळवड उत्सव मोठ्या उत्साहात आणि एकोप्याने साजरा करण्याची परंपरा आहे. या कार्यक्रमात करुणा रामदास पाटील (माजी सरपंच, मायखोप), स्नेहा पाटील, दत्तात्रेय भोईर, निलेश पाटील, कलाकार भोईर, अक्षय भोईर, कैलास पाटील, दशरथ घरत, जालंदर पाटील तसेच समस्त कार्यकारी मंडळ व रामदास पाटील मित्र मंडळ यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचा सहभाग नोंदवला.
‘साहित्य धवलारिणी कवीकट्टा’ ही संकल्पना आगरी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील (मायखोपकर) यांची असून सदर उपक्रमाचे आयोजन रामदास पाटील यांनी केले होते. समाजातील रूढी-परंपरा जपण्यासाठी असे उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. होळी नृत्यासह होळीगीते व कवितांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.