Uncategorized

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भाऊ कदम यांचा पालघर दौरा.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भाऊ कदम यांचा पालघर दौरा.

पालघर (प्रतिनिधी)
ग्रामविकास, जनजागृती व लोकसहभागाचा ठोस संदेश
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती व प्रबोधनासाठी सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी पालघर जिल्ह्यातील हमरापूर, घोलवड व उमरोळी ग्रामपंचायतींना भेट देत ग्रामविकासाशी निगडित विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ, शेतकरी, महिला, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व बचत गटातील महिलांशी थेट संवाद साधला.
हमरापूर ग्रामपंचायतीत पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी देणाऱ्या वॉटर एटीएम उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करून नियमित व्यायामशाळेला भेट दिली. सीएसआर निधीतून बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले. वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना ग्रामस्थांनी दिलेले ‘भाऊ बंधारा’ हे नाव विशेष भावल्याचे त्यांनी सांगितले. भाऊ कदम यांनी स्वतः श्रमदान करत बंधाऱ्यावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. या बंधाऱ्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग व लोकसहभागातूनच शाश्वत ग्रामविकास शक्य असल्याचे नमूद करत, पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती राज्यासाठी आदर्श ठरत असल्याचे भाऊ कदम यांनी सांगितले.
वाडा खडकोना येथील बंधाऱ्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी घोलवड ग्रामपंचायतीला भेट दिली. येथे मध उत्पादन केंद्राची पाहणी करत, शासनाने महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव म्हणून घोषित केलेल्या घोलवड येथील शुद्ध मध, बांबू उत्पादने, वारली कला व चिकूपासून तयार पदार्थांचे त्यांनी विशेष कौतुक केले. ग्रामपंचायत वाचनालय व शाळेला भेट देताना घोलवड ही वेगळी व विशेष ग्रामपंचायत असून निश्चितच तिला पुरस्कार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमरोळी ग्रामपंचायतीतील कार्यक्रमात ग्रामस्थांशी संवाद साधताना शासनाने थेट जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकसहभाग, एकोप्याने काम व सातत्य यामुळेच सर्वांगीण विकास साध्य होतो, असे स्पष्ट करत नूतनीकरण करण्यात आलेल्या उमरोळी मासळी बाजाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
उमरोळी येथे विशेष आकर्षण म्हणून अभिनेते संदीप पाठक यांनी ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हे लोकप्रिय नाटक सादर केले. नाट्यप्रयोगाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तिन्ही ठिकाणी पारंपरिक तारपा नृत्याने भाऊ कदम यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनीही तारपा नृत्यात सहभागी होत ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. तसेच उमेद अभियानांतर्गत महिलांनी उभारलेल्या विविध उत्पादन स्टॉल्सना भेट देत बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.
या दौऱ्यावेळी आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, ग्रामसेवक नीलेश देवरे, सरपंच प्रभाकर पाटील, सरपंच रविंद्र बुजड, सरपंच अवनी सांबरे, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button