Uncategorized

विरारमध्ये ‘कोकण व विभागीय सरस २०२६’ मेळावा; ग्रामीण उत्पादने व कोकणच्या चवींचा संगम

विरारमध्ये ‘कोकण व विभागीय सरस २०२६’ मेळावा; ग्रामीण उत्पादने व कोकणच्या चवींचा संगम


विरार : (प्रतिनिधी)कोकणातील अस्सल खाद्यसंस्कृती, ग्रामीण कला आणि महिला स्वयंसहायता समूहांच्या कर्तृत्वाचा संगम अनुभवण्याची संधी विरारकरांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण व विभागीय सरस २०२६’ या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा १२ ते १६ मार्च २०२६ दरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत म्हाडा मैदान (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा उद्देश ग्रामीण महिलांच्या हातगुणांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
मेळाव्यात स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक मसाले, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे कोकणातील पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शनही नागरिकांना घडणार आहे.
या प्रदर्शनात कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील स्वयंसहायता समूहांचा सहभाग राहणार असून एकूण १५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये पालघर जिल्हा परिषद – ६० स्टॉल, वसई-विरार महानगरपालिका – ५० स्टॉल, रायगड – १० स्टॉल, ठाणे – १० स्टॉल, रत्नागिरी – १० स्टॉल आणि सिंधुदुर्ग – १० स्टॉल असा सहभाग असणार आहे. त्यापैकी ३० स्टॉल खाद्यपदार्थांसाठी तर १२० स्टॉल हस्तकला व विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी असतील.
मेळाव्यात कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीची खास मेजवानीही नागरिकांना अनुभवता येणार आहे. पुरणपोळी, उकडीचे मोदक, घावणे, रस शिरवाळे, कोंबडी-वडे, नाचणीच्या भाकरी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद येथे घेता येणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी प्रदर्शनस्थळी नियंत्रण कक्ष तसेच आरोग्य कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यामुळे महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळणार आहे.
१२ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत विरार येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांची खरेदी करावी तसेच कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मनोजकुमार सूर्यवंशी आणि मनोज रानडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button