देहेरे येथे ‘ज्ञानज्योती’ सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन


देहेरे येथे ‘ज्ञानज्योती’ सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन
पालघर, (वार्ताहर) : जव्हार तालुक्यातील देहेरे येथील समाजमंदिरात रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ‘ज्ञानज्योती’ सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघ चे आमदार हरीशचंद्र सखाराम भोये यांच्या हस्ते वाचनालय व अध्ययन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप जिल्हा सरचिटणीस ज्योती हरीशचंद्र भोये यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच देहेरे-देवगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जितेश हरीशचंद्र भोये, उपसरपंच सुमन दुर्गादास महाले आणि ग्रामसेवक अमित अशोकराव बोर्डे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वाचनालयाची उभारणी खावडा ट्रान्समिशन प्रोजेक्टच्या सहकार्याने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासून स्पर्धा परीक्षांसाठी जिद्द आणि चिकाटीने तयारी करावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी विविध संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके, वर्तमानपत्रे तसेच इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे देहेरे व परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक, महिला बचत गट तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन देहेरे-देवगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले. 📰