राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन


राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
बेटेगाव | प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, राष्ट्रभक्ती व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, बेटेगाव येथे सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सेवा निवृत्त मुख्याध्यापिका डॉ. स्मिता सुधीर माळवदे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या व्याख्यानातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे आदर्श मातृत्व, मार्गदर्शक भूमिका आणि स्वराज्य स्थापनेतील योगदान प्रभावीपणे उलगडून सांगितले. “शिवाजी महाराजांना केवळ माझा मुलगा न मानता संपूर्ण महाराष्ट्राचा राजा म्हणून घडवावे,” अशी जिजाबाईंची शिकवण त्यांनी विविध प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडली.
तसेच भारतीय संस्कृतीचे महान दूत, रामकृष्ण मिशनचे संस्थापक आणि तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्यावर आधारित स्वतः लिखित कविता त्यांनी सादर करून विद्यार्थ्यांना भारावून टाकले. शिक्षणाचे महत्त्व, समानता, आत्मविश्वास व सामाजिक जबाबदारी यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थिनीने तयार केलेला पुष्पगुच्छ देऊन माध्यमिक शिक्षिका सौ. कोल्हे मॅडम यांनी वक्त्यांचे स्वागत केले. यावेळी माध्यमिक शिक्षक श्री. मस्के सर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती औटी मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सोनाली तांडेल मॅडम यांनी केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन व सामाजिक जाणीव निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.