Uncategorized

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत ‘संवेदना’ प्रकल्पातून पालघर जिल्ह्यात मानसिक आरोग्य जनजागृती

मी

जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत ‘संवेदना’ प्रकल्पातून पालघर जिल्ह्यात मानसिक आरोग्य जनजागृती

पालघर (प्रतिनिधी)जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत ‘संवेदना’ प्रकल्पाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर बस स्थानक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा – शिगाव तसेच शासकीय माध्यमिक शाळा – नंडोरे येथे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणारी पथनाट्ये सादर करण्यात आली.
यापूर्वी दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी वाडा, मासवण व नंडोरे या ठिकाणी अशाच प्रकारे पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. या उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून येत्या दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी माहीम, केळवे व सफाळे येथे पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या जनजागृती उपक्रमाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक समाजामध्ये मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा आहे. पथनाट्यांच्या माध्यमातून मानसिक आजारांबाबत समाजात प्रचलित असलेले गैरसमज, चुकीच्या समजुती व अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. मानसिक आजार हा अंधश्रद्धा किंवा भूतबाधा नसून तो एक वैद्यकीय आजार आहे, तसेच वेळीच ओळखून योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, हा महत्त्वाचा संदेश या नाट्यप्रयोगातून देण्यात आला.
यासोबतच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मोफत व शासकीय पातळीवरील उपचार व मार्गदर्शन सेवा उपलब्ध असून मानसिक आरोग्याविषयी सल्ला घेण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १४४१६ वर संपर्क साधता येतो, याची माहितीही नागरिकांना देण्यात आली.
ही पथनाट्ये मातृकृपा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. या उपक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी मानसिक आरोग्य उपचार, समुपदेशन व उपलब्ध सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली.
या कार्यक्रमास जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या मानसशास्त्रज्ञ प्रज्ञा सारवडीकर, विनय मोरताटे, स्वप्नाली तुंबडा, संवेदना प्रकल्पाचे पालघर जिल्हा समन्वयक अशोक शेरकर, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक कृष्णा पद्ममोर तसेच मातृकृपा नर्सिंग कॉलेजच्या जयश्री काटकर उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button