कॉम. गोदावरी परुळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे राष्ट्रीय परिषदेत घवघवीत यश



कॉम. गोदावरी परुळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे राष्ट्रीय परिषदेत घवघवीत यश
तलासरी (प्रतिनिधी)तलासरी येथील कॉम. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातील डॉ. अनिल गायकवाड आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा. राकेश खताळ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि एस. पी. डी. एम. महाविद्यालय शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पीएम-उषा योजने अंतर्गत शिरपूर येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार देण्यात आला. महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालयातील प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रोत्साहन देत विविधांगी संशोधनपूरक दिलेल्या पाठबळामुळेच हे शक्य झाल्याचे दोन्ही प्राध्यापकांनी आपल्या मनोगतात सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापक जर संशोधनात अग्रेसर झाले तर त्याचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यासोबतच समाजालाही होईल असे मत तलासरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी मांडले.
ह्या बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत डॉ. अनिल गायकवाड यांनी ‘डिझाईन थिंकिंग आणि त्याची एनईपी-2020 अंतर्गत उपयोगिता’ व प्रा. राकेश खताळ यांनी ‘हायड्रोजनेशन आणि डिहायड्रोजनेशनसाठीचे उत्प्रेरक’ ह्या विषयावर आधारित आपले संशोधन सादर केले. परिषदेतील सहभागी मान्यवरांनी संशोधनाची वाखाणणी करत दोन्ही संशोधकांचा गौरव केला. ह्यासाठी तलासरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. शरद पाटील आणि शिरपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.