मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोळगाव ग्रामपंचायतीची सर्वांगीण कामगिरी


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोळगाव ग्रामपंचायतीची सर्वांगीण कामगिरी
पालघर (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने कोळगाव ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. अभियानातील निकष पूर्ण करून ग्रामपंचायतीला परिस्तोषिक प्राप्त व्हावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ समन्वयाने कार्यरत आहेत.
सरपंच कुणाल चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच किरण संखे, ग्रामसेवक जितेंद्र पवार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहभागातून विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने श्रमदानातून वनराई बंधारे उभारण्यात आले असून, मनरेगा अंतर्गत नाले सरळीकरणाची कामे राबविण्यात येत आहेत. प्रलंबित घरकुलांची पूर्तता तसेच नवीन घरकुल प्रस्तावांची अंमलबजावणीही सुरू आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक बळकटीसाठी घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची नियमित व परिणामकारक वसुली करण्यात येत आहे. स्वच्छता, मूलभूत सुविधा, नोंदवही अद्ययावत ठेवणे तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामसचिवालयासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, गाव तलाव आणि स्वच्छतेशी संबंधित विविध विकासकामे टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहेत.
लोकवर्गणी व सीएसआर फंडाच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्ते सुधारण्यात आले असून, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून एक घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कामांमुळे गावातील नागरी सुविधा अधिक सक्षम होत आहेत.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांना ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, उत्साहाने सर्व ग्रामस्थ या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्दिष्टांनुसार कोळगाव ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.