Uncategorized

धरमपूर-कोसेसरी नवीन रस्ता खचला; निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न

धरमपूर-कोसेसरी नवीन रस्ता खचला; निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न
डहाणू/प्रसाद भालेराव
तालुक्यातील धरमपूर–कोसेसरी दरम्यान नुकताच बांधण्यात आलेला नवीन रस्ता काही दिवसांतच खचल्याचे गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात माती खचून दगड उघडे पडले असून रस्त्याचा पाया कमकुवत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या कामाबाबत इस्टीमेटनुसार काम झाले नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान डहाणू तालुकाध्यक्ष मनोज पारधी यांनी केला आहे. आदिवासी उपयोजना सन २०२२- २०२३ नुसार ५०५४ लेखाशिर्षाअंतर्गत अडीच किलोमीटरच्या नवीन रस्त्याकरिता अंदाजित ७६ लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्ता बांधताना आवश्यक दगडी सोलिंग, भराव अथवा पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने रस्ता खचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
सदर रस्ता ग्रामीण आदिवासी भागातील शेतकरी, विद्यार्थी व दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वाचा असून सध्याच्या परिस्थितीत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही होत आहे. पारधी यांनी या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच निकृष्ट कामाची रक्कम वसूल करावी अशी मागणी केली आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सदर रस्त्याचे काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले नसून, कामाचे फलक सुद्धा लावण्यात आले नाही. आदिवासी बहुल भाग असल्याने संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तरी तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी.या संदर्भात निवेदन दिले आहे. कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
श्री.मनोज पारधी.
अध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी,डहाणू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button