“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा भव्य शुभारंभ


“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा भव्य शुभारंभ
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) : जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी अभियानाविषयी माहितीपर व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य शासनाने या अभियानाद्वारे ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी, यावर शासनाचा विशेष भर आहे. गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासोबतच माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांनाही प्राधान्य देण्यात आले आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार असून, यासाठी ६५.२५ कोटी रुपयांच्या पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे.
“हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याचा दर्जा उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडेल,” असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.