Uncategorized

खरीप हंगाम नियोजनासाठी कोकण विभागस्तरीय कार्यशाळा संपन्नखते-बियाणे उपलब्धता व सुधारित भात वाणांवर विशेष भर

खरीप हंगाम नियोजनासाठी कोकण विभागस्तरीय कार्यशाळा संपन्न
खते-बियाणे उपलब्धता व सुधारित भात वाणांवर विशेष भर


पालघर (प्रतिनिधी):
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील शेतकऱ्यांना वेळेवर व गुणवत्तापूर्ण कृषी सेवा मिळावी, यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कोकण विभागस्तरीय खरीप हंगाम नियोजन कार्यशाळा उत्साहात पार पडली. विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेत खरीप हंगामात खते व बियाण्यांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला. यासोबतच सुधारित भात बियाण्यांच्या वाणांचा वापर वाढवणे, बीज प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन भात वाणांचे लागवडीखालील क्षेत्र वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे, तसेच आत्मा व कृषी निविष्टा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सुनील बोरकर यांनी युरिया खताच्या पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच खतांची नियमबाह्य विक्री होऊ नये यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व कृषी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेला पालघर जिल्ह्यातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, प्रकल्प संचालक (आत्मा) विनायक पवार, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेमुळे कोकण विभागात खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन अधिक सक्षम होऊन शेतकऱ्यांना वेळेवर सेवा व विविध योजनांचा लाभ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button