Uncategorized

जव्हार पंचायत समिती कार्यालयावर सरपंच संघटनेचा हंडा मोर्चा’

जव्हार पंचायत समिती कार्यालयावर सरपंच संघटनेचा हंडा मोर्चा

जव्हार पालघर प्रतिनिधी

जव्हार दि. २३ जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचा शासनाचा उद्देश अद्याप कागदावरच असल्याचे चित्र जव्हार तालुक्यात दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये पाईपलाईन, जलकुंभ व जोडणीची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, या मागणीसाठी मंगळवारी ता.जव्हार जव्हार पंचायत समिती कार्यालयावर ‘लाडक्या बहिणींचा हंडा मोर्चा’ काढण्यात आला.
या मोर्चात तालुक्यातील विविध गावांमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. डोक्यावर हंडे घेऊन महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. “हर घर जल, पण आमच्या घरात कधी?”, “नळ आहे, पण पाणी नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जल जीवन मिशनच्या कामांतील दिरंगाई, निकृष्ट दर्जा व संबंधित यंत्रणांची उदासीनता याविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला.
मोर्चानंतर पंचायत समिती अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील सर्व अपूर्ण पाणीपुरवठा कामांची तातडीने पाहणी करून ठरावीक कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. अधिकाऱ्यांनी लवकरच कामांचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पाण्याअभावी महिलांना रोजच्या कामांसह शिक्षण, आरोग्य व उपजीविकेवरही परिणाम सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पाणी ही मूलभूत गरज असून शासनाने दिलेली योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
कोट…..
जव्हार पंचायत समिती येथे सरपंच संघटना यांच्या मध्ये सविस्तर मिटींग घेऊन सर्व योजनाची संयुक्त चौकशी करून अपूर्ण जल जीवन मिशन योजना कामे सर्व ठेकेदार यांच्या कडून २०२६ डिसेंबर पर्यत पूर्ण करून घेणार.
—-सचिन सुरूम कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा पंचायत समिती जव्हार.
कोट……
जल जीवन मिशन योजना मार्च २०२६ पर्यत जव्हार तालुक्यातील अपूर्ण योजना कामे जर पूर्ण झाल्या नाहीत तर तर यापुढे जिल्हाधिकारी कार्यालय /पालघर जिल्हा परिषद कार्यालय सरपंच संघटने कडून आंदोलन करण्यात येईल यांची शासनानी दखल घ्यावी.
—एकनाथ दरोडा सरपंच संघटना जव्हार..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button