कॉ.गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे विविध कलागुणांचे प्रदर्शन



कॉ.गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे विविध कलागुणांचे प्रदर्शन
पालघर (प्रतिनिधी)
आदिवासी प्रगती मंडळ संचालित, कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तलासरी येथे प्राचार्य डॉ. बी ए राजपूत यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक विभागातर्फे दिनांक 18 डिसेंबर 2025 ते 23 डिसेंबर 2025 दरम्यान सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताहाची सुरुवात डॉ. बी. ए. राजपूत यांचा हस्ते दिपप्रज्वलन व कॉ. गोदावरी शामराव परुळेकर यांच्या प्रतिमापूजनाने आणि त्यांच्या मार्गदर्शनपर प्रास्ताविकाने करण्यात आली .
प्रास्ताविकामध्ये प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक सप्ताहाबद्दल शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयाद्वारे आयोजित , सांस्कृतिक सप्ताह दरम्यान होणाऱ्या विविध स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.
सदर सप्ताहाची सुरुवात साडी आणि टाय (डे) दिवसाने झाली. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींनीने भारतीय संस्कृतीक पेहेराव म्हणून ओळखली जाणारी साडी , साड्यांच्या नेसल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पद्धतीचे सादरीकरण केले. त्याचबरोबर ह्या दिवशी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास ,व्यक्तिमत्व ,कौशल्य यांचे परीक्षण करून Mr.CGSP आणि Miss.CGSP म्हणुन उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सदर सप्ताहात बॉलीवूड (डे) दिवस देखील साजरा करण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय सिनेसृष्टीच्या विविध कलाकारांचे रेखाटन केले व आपल्या अभिनय कौशल्या चे दर्शन घडवले.
सप्ताह दरम्यान पारंपरिक (ट्रॅडिशनल डे ) दिवसाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रादेशिक जसे मराठी, गुजराती, बंगाली, आदिवासी धोडी, कोळी, काश्मिरी ,राजस्थानी, मद्रासी,इ.चे पारंपारिक पोशाख ,पारंपारिक नृत्यशैली, अलंकार, प्रादेशिक भाषा यांची ओळख आपल्या सादरीकरणातून प्रेक्षक विद्यार्थ्यांना करून दिली.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पाक कलेला , व्यावसायिक कौशल्याला वाव देण्यासाठी (फूड फेस्टिवल) खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध खाद्यपदार्थांचे, खेळांचे स्टॉल उभारून विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या सांस्कृतिक सप्ताहाच्या शेवटी प्रतिभा शोध (Talent Hunt) ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रांगोळी ,मेहंदी, चित्रकला, वकृत्व , नृत्य , गायन , अभिनय इत्यादी स्पर्धेचा समावेश होता.
सदर प्रतिभा शोध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या रांगोळी व चित्रकलेद्वारे विविधतेत एकता ,प्रदूषण मुक्तता, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत यांचा संदेश दिला . तसेच आपल्या वक्तृत्वाद्वारे स्त्री पुरुष समानता , शेतकऱ्यांची कर्जमुक्तता , कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी विषयांवर प्रकाश टाकला. याचसोबत विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या गायन, नृत्य आणि अभिनय ,एकपात्री नाटक इत्यादी कौशल्यांचे देखील दर्शन सदर स्पर्धेमध्ये घडवून दिले.
सदर सांस्कृतिक सप्ताहामध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला.
या संपूर्ण सांस्कृतिक सप्ताहामध्ये महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापकांनी सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात परीक्षक म्हणून मुख्य भूमिका बजावली. तसेच संपूर्ण सप्ताहाचे आयोजन ,नियोजन करण्यास व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेषतः सांस्कृतिक विभागाच्या सदस्यांचे व सर्व सहाय्यक प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.