Uncategorized

पालघर जिल्ह्यातील दुर्गम उपपाड्यांना जोडणाऱ्या ५४ अनकनेक्टेड रस्त्यांना मंजुरी

पालघर जिल्ह्यातील दुर्गम उपपाड्यांना जोडणाऱ्या ५४ अनकनेक्टेड रस्त्यांना मंजुरी
पालघर (प्रतिनिधी)
विकसित भारत जी राम जी मधून खडीकरण, आदिवासी उपयोजन निधीतून पाडे डांबरीकरण — मूलभूत सुविधांचा मार्ग मोकळा. पालघर जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील पाडे उपपाड्यांना मुख्य गावांशी जोडणाऱ्या बारमाही रस्त्याने जोडणे (संपर्कहीन) रस्त्यांचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. जिल्ह्यात एकूण ७९ अनकनेक्टेड रस्ते पाडे व उपपाडे बारमाही रस्त्यांना जोडले नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी २५ रस्त्यांची कामे पूर्ण करून ते आधीच जोडण्यात आले असून, उर्वरित ५४ रस्ते उपपाड्यांना जोडण्यासाठी विविध योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहेत.
या ५४ रस्त्यांपैकी ४५ रस्त्यांची कामे विबी जी राम जी (मनरेगा) मधून प्रस्तावित असून, ३ रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार मार्फत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ४ रस्ते, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत तसेच २ रस्त्यांची कामे इतर माध्यमांतून करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण ५४ रस्त्यांद्वारे उपपाड्यांना मुख्य रस्ते व गावांशी जोडले जाणार आहे.
तालुकानिहाय पाहता, डहाणू तालुक्यात विबी जी राम जी अंतर्गत 13 पैकी ११ रस्त्यांची कामे सुरू आहेत. विक्रमगड तालुक्यातील ९ पैकी ८ कामे, मोखाडा तालुक्यातील ८ पैकी ७ कामे, तर जव्हार तालुक्यातील १७ पैकी १५ कामे,वाडा मधील 3 पैकी 2 आणि वसई मधील 4 पैकी 2 रस्त्याची कामे विबी जी राम जी अंतर्गत प्रस्तावित करण्यात आले आहेत. 45 पैकी 20 कामे सुरू असून उर्वरित 25 कामे सुद्धा वनविभाग व खाजगी जमिनी अंतर्गत असलेल्या कामांना देखील तालुका स्तरावरून मंजुरी मिळविण्यासाठी पाठवपुरावा सुरू असून ती कामे देखील लवकरच सुरू होणार आहेत.

तसेच डहाणू तालुक्यातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात सुरू असलेली सुमोटो केस निकाली काढून सर्वेक्षण करण्यात आले असून, त्या रस्त्याचेही काम मनरेगामधून प्रस्तावित करण्यात आले आहे.
या सर्व रस्त्यांचे खडीकरण विबी जी राम जी योजनेतून करण्यात येणार असून, डांबरीकरणाचे काम आदिवासी उपयोजन निधीतून करण्यात येणार आहे. प्रस्तावित रस्त्यांपैकी ४ रस्ते वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातून, वनजमिनीवरून १३ रस्ते, खाजगी जमिनीवरून13 रस्ते जाणारे आहेत. खाजगी जमिनींच्या संदर्भात तालुका पातळीवर ३/२ अशा स्वरूपाचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यास मंजुरी मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. विविध यंत्रणांमधील समन्वय, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच आवश्यक मंजुऱ्यांसाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घेतल्यामुळे हे सर्व प्रस्ताव मार्गी लागले असून, प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
या संदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी विक्रमगड तालुक्यातील भोपोली–शेतीपाडा येथील सुरू असलेल्या कामाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या रस्त्यांमुळे अनेक उपपाडे मुख्य गावांशी, बाजारपेठांशी तसेच आरोग्य व शैक्षणिक सेवांशी जोडली जाणार आहेत. पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटणाऱ्या भागांमध्ये आता वर्षभर दळणवळण शक्य होणार आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले की,
“दुर्गम व आदिवासी पाड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे जिल्हा परिषदेचे प्राधान्य आहे. रस्ते ही विकासाची मूलभूत गरज असून, त्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा, शालेय शिक्षण, पोषण आहार तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवता येतील. या रस्त्यांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होईल.”
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी नमूद केले आहे की,
“या रस्त्यांमुळे उपपाड्यांमधील दळणवळण सुलभ होणार असून, आरोग्य सुविधा पोहोचवणे, कुपोषण निर्मूलन आणि शैक्षणिक सुविधा बळकट करण्यास मोठी मदत होईल. जिल्हा परिषद या पाड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे.”
या रस्ते प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून, वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या उपपाड्यांमधील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button