Uncategorized

पाटील इन्फोटेक, कुडूस येथे बार्टी व एम.सी.ई.डी.मार्फत सायबर सिक्युरिटी प्रशिक्षणाचा शुभारंभसायबर सिक्युरिटी व डेटाबेस क्षेत्रात उज्ज्वल संधी – धम्मपाल थोरात

पाटील इन्फोटेक, कुडूस येथे बार्टी व एम.सी.ई.डी.मार्फत सायबर सिक्युरिटी प्रशिक्षणाचा शुभारंभ
सायबर सिक्युरिटी व डेटाबेस क्षेत्रात उज्ज्वल संधी – धम्मपाल थोरात


वसई (प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पाटील इन्फोटेक, कुडूस यांच्या सहकार्याने दोन महिन्यांच्या सायबर सिक्युरिटी अँड डेटाबेस रिकव्हरी या अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दि. २८ मार्च २०२६ रोजी कुडूस (ता. वाडा) येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. बार्टीचे प्रकल्प अधिकारी विलास साबळे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.
एम.सी.ई.डी. पालघरचे प्रकल्प अधिकारी धम्मपाल थोरात यांनी प्रस्तावनेत प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट करत सायबर सिक्युरिटी व डेटाबेस रिकव्हरी क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच बार्टीचे विविध उपक्रमांची माहिती देत विलास साबळे यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
पाटील इन्फोटेकचे संचालक पराग पाटील यांनी कुडूसमध्ये प्रथमच हायटेक प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल बार्टी व एम.सी.ई.डी.चे आभार मानले व प्रशिक्षण उच्च दर्जाचे देण्याचे आश्वासन दिले. तांत्रिक प्रशिक्षक प्रमोद गवळी यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण समन्वयक सचिन माळवे यांनी केले.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना तांत्रिक कौशल्य देऊन त्यांना स्वयंरोजगार किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशिक्षणामध्ये प्रॅक्टिकलसह तांत्रिक ज्ञानाबरोबरच उद्योग उभारणी, शासकीय कर्ज व अनुदान योजना, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, कर व परवाने यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी ३० पात्र लाभार्थ्यांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात आली असून प्रशिक्षणानंतर पुढील दोन वर्षे एम.सी.ई.डी.मार्फत उद्योग उभारणी व स्वयंरोजगारासाठी मोफत मार्गदर्शन व सहाय्य दिले जाणार आहे.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना आधुनिक तांत्रिक क्षेत्रात नवे मार्ग खुल्या होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button