मल्टीटॅक पोलिमार्स कामगारांचे उपोषण स्थगित; मागण्या मान्य करण्याचे आश्वासन


मल्टीटॅक पोलिमार्स कामगारांचे उपोषण स्थगित; मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

पालघर, दि. २३ मार्च २०२६ (प्रतिनिधी) :
शिवशक्ती-भीमशक्ती तसेच रिपाई कामगार संघटनेच्या वतीने मल्टीटॅक पोलिमार्स कंपनीतील कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस कंपनीचे मालक शुभाष गुवेकर (सीओ), रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, कामगार नेते अशोक बंडे, कामगार आयुक्त महाले साहेब तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सकारात्मक तोडगा निघत कंपनीचे मालक शुभाष गुवेकर यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या २ एप्रिल २०२६ रोजी कामगारांचे थकित हिशेब व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
यानंतर कामगार आयुक्त महाले व दाभाडे सर यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांशी संवाद साधला आणि उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्ते कामगारांचे उपोषण सोडविण्यात आले.
या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला आहे.