Uncategorized

पालघर मध्ये काँग्रेसचा १४० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा.

पालघर मध्ये काँग्रेसचा १४० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा.

भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ धोरणावर काँग्रेस नेत्यांचा तीव्र हल्लाबोल.

पालघर (प्रतिनिधी):पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २८ डिसेंबर रोजी काँग्रेस भवनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १४० वा स्थापना दिवस उत्साह व संकल्पाने साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून लोकशाहीची स्थापना व संविधानाच्या संरक्षणापर्यंत काँग्रेसचे योगदान अतुलनीय असल्याचे सांगितले.भाजपाकडून दिला जाणारा ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा हा देशाच्या लोकशाही परंपरांवर थेट आघात असल्याचा आरोप वक्त्यांनी केला.ज्येष्ठ काँग्रेस नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते काँग्रेसचा ध्वज फडकावून सलामी देण्यात आली. काँग्रेस ही केवळ एक राजकीय पक्ष नसून देशाची आत्मा व विचारधारा आहे, जी प्रत्येक संकटात देशाला दिशा देत आली आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आपापसातील मतभेद विसरून काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा आणि जनतेचा आवाज बनण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
भाजपा सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करताना महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था तसेच लोकशाही संस्थांचा गैरवापर यामुळे जनता त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. संविधान, समानता व सामाजिक न्यायाच्या मार्गावर देशाला पुन्हा नेण्याची ताकद फक्त काँग्रेसकडेच असल्याचे वक्त्यांनी ठामपणे नमूद केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पस्टे, प्रभारी तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, ज्येष्ठ महिला नेत्या संगीता धोंडे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा पोतदार, अ‍ॅड. सुधीर जैन, नरोत्तम पाटील, अ‍ॅड. सुनंदा बेलकर, अविश राऊत, अरविंद सिंह क्षत्रिय, अ‍ॅड. दीपक सावळे, रामप्रकाश निराला, अ‍ॅड. मनोज दांडेकर, राजीव शुक्ला, बच्चा ठाकूर, रोशन पाटील, मनोज पाटील, अशद चुनावाला, प्रकाश संखे, रामनरेश यादव, मनोहर दांडेकर, हिमांशु दुबे, अनिल ताराबातकर, शैलेश ठाकूर, चिराग देसाई आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. शैला प्रसाद यांच्यासह अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मेने यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button