पतपेढीच्या अध्यक्षपदी संतोष पावडे तर संचालकपदी मायकल सर यांची बिनविरोध निवड

पतपेढीच्या अध्यक्षपदी संतोष पावडे तर संचालकपदी मायकल सर यांची बिनविरोध निवड
पालघर | प्रतिनिधी
पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक संतोष पावडे यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच वसई विभागातील रिक्त संचालकपदी संघटना व पतपेढी समन्वयक मायकल सर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पालघर व ठाणे अशा दोन जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या या पतपेढीचे २७०० हून अधिक सभासद असून सुमारे १७० कोटी रुपयांचे भांडवल आहे. पतपेढीचे कार्यक्षेत्र पालघर व ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा-भाईंदर, वसई, विरार, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार व वाडा तालुक्यांतील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासदांपर्यंत विस्तारलेले आहे.
पतपेढीच्या मालकीची भाईंदर, वसई, सफाळे, पालघर व डहाणू येथे स्वतःची कार्यालये असून, पालघर येथील वळण नाका, माहिम रोड येथे भव्य सभागृह उपलब्ध आहे.
राज्यातील पगारदार कर्मचारी वर्गासाठी आदर्श, पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार करणारी पतपेढी म्हणून या संस्थेची ओळख निर्माण झाली आहे.
संतोष पावडे यांनी संघटनेत अनेक वर्षे कार्य केले असून, यापूर्वी सलग सहा वर्षे पतपेढीचे अध्यक्षपद भूषविले आहे. सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात गेली ३५ वर्षे सक्रिय कार्यरत असलेल्या पावडे यांच्या पुनर्निवडीमुळे पतपेढीचा कारभार अधिक विकासाभिमुख, पारदर्शक व सभासदाभिमुख होईल, अशी आशा शिक्षक सभासद वर्गातून व्यक्त केली जात आहे.