मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन


मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन
तलासरी (प्रतिनिधी)समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर २०% टक्के समाज कल्याण योजना अंतर्गत तलासरी तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर पंचायत समिती तलासरीचे गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी प्रगती मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तलासरी येथे वरिष्ठ महाविद्यालयाच्या डॉ. मोहनभाई पटेल सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी पंचायत रामू मालकरी यांनी केले, तर आदिवासी प्रगती मंडळ संचालक तथा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत व विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती तलासरी नितीन राऊत यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या शिबिरासाठी स्पर्धा परीक्षा प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांतिक तानाजी यादव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. सदर शिबिरासाठी पोलीस भरती मार्गदर्शक ओमकार विजय जाधव, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती तलासरी नयन मेरे, तलासरी तालुका व्यवस्थापक पेसा पंकज धाडगा, आदिवासी प्रगती मंडळाचे संचालक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप वावरे, प्राध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयातील १०१ विद्यार्थ्यांनी शिबिरास उपस्थिती दर्शविली. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीच्या वतीने अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सदर मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. नितिन वेडगा यांनी केले.