३७वे रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ : वाहतूक नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही – पालघर पोलीस प्रशासनाचा इशारा


३७वे रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ : वाहतूक नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही – पालघर पोलीस प्रशासनाचा इशारा
मनोर | प्रतिनिधी
३७व्या रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखा, पालघरचे प्रभारी अधिकारी श्री. सुरेश साळुंखे यांच्या वतीने मनोर परिसरात कडक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
मनोर येथे ठिकठिकाणी बॅनर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी स्पष्ट संदेश देण्यात आला. तसेच मनोर बस स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांना थेट समज देत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी रिक्षा-टॅक्सी चालकांना खालील नियमांबाबत स्पष्ट व ठाम शब्दांत मार्गदर्शन करण्यात आले :
सीट बेल्टचा वापर बंधनकारक
नो-पार्किंग ठिकाणी वाहन उभे केल्यास कारवाई
दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य
विनापरवाना वाहन चालविणे गुन्हा
वाहन चालविताना मोबाईल वापरास मनाई
अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणे गंभीर गुन्हा
ट्रिपल सीट प्रवास पूर्णतः प्रतिबंधित
अतिवेगाने वाहन चालविल्यास कठोर दंड
वाहतूक सिग्नलचे पालन सक्तीचे
विनानंबर प्लेट वाहनांवर थेट कारवाई
“वाहतूक नियम म्हणजे सूचना नाही तर कायदा आहे. नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला.
या जनजागृती मोहिमेत जिल्हा वाहतूक अंमलदार मोहन मुंढे, योगेश कमलेकर, ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार घोलप, तसेच रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ राहील, असा ठाम संदेश या अभियानातून देण्यात आला.